गांधीजींच्या अनेक सत्याग्रहांचे साक्षीदार 'टिकेकर भवन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 10:25 PM2019-10-01T22:25:17+5:302019-10-01T22:28:26+5:30

महात्मा गांधीजींचे नागपुरातील आणखी एक हक्काचे घर होते, ते म्हणजे धंतोलीतील टिकेकर भवन. टिकेकर बंगला या नावाने हे घर आजही सर्वपरिचित आहे.

Witness to many of Gandhi's Satyagraha 'Tikekar Bhavan' | गांधीजींच्या अनेक सत्याग्रहांचे साक्षीदार 'टिकेकर भवन’

गांधीजींच्या अनेक सत्याग्रहांचे साक्षीदार 'टिकेकर भवन’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा गांधीजी यांचे नागपूरशी अतूट नाते होते. सेवाग्रामचा आश्रम होण्यापूर्वीपासूनच ते नागपुरात सातत्याने येत असत. पूनमचंद रांका, जनरल मंचरशा आवारी यांच्या घरी त्यांचा मुक्काम असायचा. यासोबतच महात्मा गांधीजींचे आणखी एक हक्काचे घर होते, ते म्हणजे धंतोलीतील टिकेकर भवन. टिकेकर बंगला या नावाने हे घर आजही सर्वपरिचित आहे.


देशभक्त गणपतराव टिकेकर हे नागपुरातील श्रीमंतांपैकी एक होते. इंग्रजांच्या काळात रेल्वे कॉन्ट्रॅक्टर असलेले गणपतराव यांचे स्वांतत्र्यसंग्रामात भरीव योगदान होते. काँग्रेसला नागपुरात मजबूत करण्याचे काम त्यांनीच केले. नागपुरात प्रसिद्ध अजनी रेल्वे पूल, रेल्वे स्टेशनवरील पूल आणि मोक्षधाम घाटावरील रेल्वे पूल त्यांनीच तयार केला आहे.
गणपतराव टिकेकर यांचे घर म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीचे कार्यालयच होते. त्यामुळे त्यांच्या घरी पं. मोतीलाल नेहरू, मीरा बेन, लाला लजपत राय, सरदार पटेल, सरोजिनी नायडू, राजेंद्र प्रसाद, विनोबा भावे, नेताजी सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास, खान अब्दुल गफार खान (सरहद गांधी), आचार्य विनोबा भावे,आदींसह महात्मा गांधी आणि कस्तुरबांचे वास्तव्य असायचे. दरम्यान देशभरात गाजलेला जंगल सत्याग्रह असो की, झेंडा सत्याग्रह, असहयोग आंदोलन असो की मिठाचा सत्याग्रह या आंदोलनाच्या पूर्वीची चर्चा टिकेकर भवनातच रंगायची.

बकरीचे दूध आणि उकडलेले खाद्यपदार्थ
महात्मा गांधीजी टिकेकर भवनात एकूण चार वेळा थांबले. दोनदा एक-एक महिन्यासाठी तर दोनदा १५-१५ दिवसांचा मुक्काम होता. त्यांच्यासोबत कस्तुरबा गांधी आणि ४० ते ५० नेते-कार्यकर्ते राहायचे. वरच्या माळ्यावर सर्वांची राहण्याची व्यवस्था असायची. महात्मा गांधीजी बकरीचे दूध प्यायचे. त्यामुळे बंगल्यातच ५० बकऱ्या आणून ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय उकडलेले खाद्यपदार्थ त्यांना खाऊ घालण्यात येत असत.
सुवर्णदान
काँग्रेसच्या मदतीसाठी महात्मा गांधीजींना सुवर्णदान देण्याचा कार्यक्रम बंगल्याच्या गच्चीवरच आयोजित करण्यात आला. यावेळी गणपतरावजींच्या पत्नीसह बॅरिस्टर अभ्यंकरांच्या पत्नीनेही आपले सोन्याचे कडे दान दिले होते.

खादी भंडार आणि टिळक विद्यालयाला जागा दान
गणपतराव टिकेकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. सीताबर्डी येथील त्यांनी आपला एक प्लॉट खादी ग्रामोद्योग भंडारसाठी दिला. त्याचे उद्घाटन गांधीजींच्या हस्ते करण्यात आले. तसेच धंतोली येथील जागाही शाळेला दान दिली. त्या ठिकाणी टिळक महाविद्यालय उभे आहे. या शाळेचे उद्घाटनही महात्मा गांधीजींच्या हस्ते करण्यात आले.

मिठाचा सत्याग्रह
महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह पुकारला होता. सरोजिनी नायडू नागपुरात आल्या होत्या. त्यांनी समुद्राचे पाणी आणले होते. टिकेकर भवनातच त्या पाण्याचे मीठ तयार करण्यात आले. या मिठाच्या पुड्या तयार करून एक पुडी ५०० रुपयाप्रमाणे विकण्यात आली. गणपतरावजींनी त्याची जबाबदारी उचलली. तो पैसा आंदोलनाला मदत करण्यासाठी देण्यात आला.

Web Title: Witness to many of Gandhi's Satyagraha 'Tikekar Bhavan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.