बायका झाल्या अत्याचारी, नवरे करताहेत तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 07:30 AM2022-12-07T07:30:00+5:302022-12-07T07:30:02+5:30
Nagpur News आधुनिक काळात पत्नीपीडित पुरुषांचीदेखील संख्या वाढत आहे. पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाने त्रस्त झालेल्या पुरुषांकडून पोलिसांकडे दाद मागण्यात येत आहे.
योगेश पांडे
नागपूर : पतीकडून पत्नीच्या छळाच्या तक्रारी नियमितपणे पोलिसांना मिळत असतात व या प्रकरणांवर समाजातदेखील चर्चा घडत असते. मात्र, आधुनिक काळात पत्नीपीडित पुरुषांचीदेखील संख्या वाढत आहे. पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाने त्रस्त झालेल्या पुरुषांकडून पोलिसांकडे दाद मागण्यात येत आहे. नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे पत्नीपीडित पुरुषांनी या वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत दीडशेहून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत.
एकत्र कुटुंबपद्धती कमी होत असताना पती, पत्नी व मुलं अशी कुटुंबे जास्त दिसून येतात. अशा व्यवस्थेत अनेकदा पती-पत्नीचे वाद होताना दिसून येतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांकडून अनेकदा कळत-नकळतपणे पुरुषांचा छळ करण्यात येतो. याला त्रासून पुरुष अखेर पोलिसांकडे धाव घेतात. यावर्षी १५ ऑगस्टपर्यंत भरोसा सेलकडे १४० पुरुषांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. दर महिन्याला सरासरी १६ तक्रारी दाखल झाल्या होत्या. नोव्हेंबरअखेरपर्यंत हा आकडा १६० हून अधिक गेला होता.
‘परंपरा, प्रतिष्ठा’ दूर ठेवून तक्रारीसाठी हिंमत
सासरी वाद झाला की, महिला पोलिस ठाणे गाठून पती किंवा सासरच्यांविरोधात तक्रारी दाखल करते. शिवाय गुन्हा दाखल करण्यावरदेखील भर असतो. समाजातील विविध घटकांचे महिलांना समर्थनदेखील मिळते; परंतु पत्नीकडून छळ होत असताना पुरुषांना बराच काळ तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. पुरुषप्रधान संस्कृती व परंपरेचा विचार करून ते ‘दुनिया क्या कहेगी’ असे म्हणत शांत बसतात. मात्र, पाणी नाकाच्या वर गेले की, मात्र पोलिसांकडे जाण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो. सामाजिक बदनामीपोटी अनेकजण पत्नीविरुद्ध तक्रार देत नाहीत. परंतु, सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर मात्र पतीसुद्धा पोलिसात तक्रार करायला लागले आहेत.
मोबाईल, अफेअर्समुळे वाद
अनेक महिला अतिजास्त प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असतात किंवा सतत मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचे पती, मुले व इतर जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होते. यातून अनेकदा वाद सुरू होतात. यासोबतच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेण्यावरूनदेखील वाद वाढतात.
१० टक्के तक्रारी पुरुषांकडून
भरोसा सेलकडे येणाऱ्या एकूण तक्रारींपैकी जवळपास १० टक्के तक्रारी पुरुषांकडून होतात. संसारातील वादाची प्रकरणे नाजूक असतात. त्यामुळे त्यांचे समुपदेशन करून संसार सुरळीत व्हावा यावरच आमचा भर असतो.
- सीमा सुर्वे, पोलिस निरीक्षक, भरोसा सेल.
पुरुषांच्या या प्रमुख तक्रारी
- पत्नी सतत ओरडते
- पत्नी नाहक चारित्र्यावर संशय घेते
- पत्नी मोबाईलमध्येच व्यस्त असते
- पत्नीकडून सासरच्यांचा सतत अपमान होतो
- पत्नी मुलांकडे लक्षच देत नाही
- पत्नी अद्वातद्वा बोलते व वेळप्रसंगी हातदेखील उचलते
- न सांगता घरातील महत्त्वाचे निर्णय घेते