नागपुरातील गोंडवाना संग्रहालयाला मिळतेय गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:21 PM2019-08-21T12:21:35+5:302019-08-21T12:24:33+5:30
गोंड राजे बख्त बुलंद शहा उईके यांनी ३५० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या नागपुरात गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाची निर्मिती करण्यात येणार होती. पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती यांनी या संस्थेला स्वायत्त संस्था म्हणून मान्यता देत, एक उपकेंद्र नागपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासींचे कलाजीवन, सांस्कृतिक जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय उभारण्यासाठी शासनाने २००२ ला मान्यता दिली. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून हे संग्रहालय उभारण्यात येणार होते. परंतु या संग्रहालयाच्या उभारणीत गेल्या १७ वर्षात जागेच्या संदर्भात अनेक अडचणी आल्या. अखेर संग्रहालयाला सुराबर्डी येथे जागा मिळाली. त्यामुळे प्रशासनानेसुद्धा संग्रहालयाच्या कामाचा वेग वाढविला आहे. आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या अध्यक्षतेत संग्रहालयासंदर्भातील बैठक मुंबईत पार पडली आहे.
गोंड राजे बख्त बुलंद शहा उईके यांनी ३५० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या नागपुरात गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाची निर्मिती करण्यात येणार होती. पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती यांनी या संस्थेला स्वायत्त संस्था म्हणून मान्यता देत, एक उपकेंद्र नागपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या उपकेंद्राला गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय असे नाव देण्यात आले. यात आदिवासी जीवन कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाºया मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, आदिवासींचे दागदागिने, देव देवता, मुखवटे, दैनंदिन वापराच्या वस्तू व शेतीसाठी वापरणाºया वस्तू, हत्यारे, पारंपरिक पोषाख, साहित्याचे जतन, बोली भाषेचे संवर्धन करण्यात येणार होते. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१४ मध्ये १० कोटी व २०१५ मध्ये ११ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातून बांधकामाचा खर्च करण्यात येणार होता. संग्रहालयासाठी शहरात जागाच उपलब्ध होत नव्हती. संग्रहालयासाठी सरकारचा जागेचा शोध संपला असून, अमरावती रोडवरील सुराबर्डी येथे संग्रहालयाला १२ एकर जागा देण्यात आली आहे.
संग्रहालयाच्या संदर्भात आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, सहसचिव सुनील पाटील, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुळकर्णी, सहसंचालिका नंदिनी आवडे, सहआयुक्त विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच प्राथमिक बैठक पार पडली. बैठकीत सल्लागार समितीचे चार समूह तयार करण्यात आले. लँडस्केप डेव्हलपमेंट, वास्तुविशारद नियोजन समूह, संग्रहालयातील संग्रह, संकल्पनेनुसार आदिवासी समुदायाशी सहभाग वाढवण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहेत.
यावेळी भोपाळच्या मानव संग्रहालयाचे प्रतिनिधी एस. के. पांडे, इतिहास संशोधक डॉ. मधुकर कोटनाके, वास्तू विशारद भक्ती ठाकूर, व्हीआरसीच्या वास्तू विशारद विभागाचे सहा. प्राध्यापक डॉ. अक्षय पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे सहा. प्राध्यापक डॉ. एस. आय. कोरेटी, वाचा म्युझियमचे संचालक मदन मीणा, वास्तू विशारद अमरजा निंबाळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाचे संचालक एस. एस. मुजुमदार आदी तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभागाच्या वतीने गोंडवाना संग्रहालयासंदर्भात बराच पाठपुरावा करण्यात आला होता. संघटनेच्या प्रयत्नाला यश आले आहे. आदिवासी समाजाच्या आदिम संस्कृतीचे जतन व्हावे, आदिवासी समाजाचा ऐतिहासिक वारसा वर्षानुवर्षे जपला जावा हा आमचा उद्देश आहे.
- दिनेश शेराम, अध्यक्ष अ.भा. आदिवासी विकास परिषद, नागपूर