पिस्तुलाच्या धाकावर ५० लाखांची खंडणी मागत महिला-मुलीला ओलीस ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:42+5:302021-06-05T04:06:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर घरातील महिला, मुलीला ओलीस ठेवून ५० लाख रुपयांची खंडणी ...

A woman and a girl were held hostage demanding a ransom of Rs 50 lakh at gunpoint | पिस्तुलाच्या धाकावर ५० लाखांची खंडणी मागत महिला-मुलीला ओलीस ठेवले

पिस्तुलाच्या धाकावर ५० लाखांची खंडणी मागत महिला-मुलीला ओलीस ठेवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर घरातील महिला, मुलीला ओलीस ठेवून ५० लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिपळा फाटा परिसरात शुक्रवारी दुपारी हा थरारक घटनाक्रम घडला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आरोपीची धुलाई करून त्याला पोलिसांनी ठाण्यात नेले.

पिपळ्यातील क्रिएटिव्ह को.ऑपरेटिव्ह सोसायटी या बहुमजली इमारतीत बिल्डर राजू वैद्य यांचे निवासस्थान आहे. शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास बुरखा घालून असलेला आरोपी वैद्य यांच्या घरात शिरला. यावेळी वैद्य यांच्या घरात दोन महिला आणि एक मुलगी होती. आरोपीने घराची दारे खिडक्या आतून लावून घेतली. या तिघींना पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून आरोपीने एका रुममध्ये बसविले. ५० लाख रुपये खंडणी मिळाल्याशिवाय तुमची सुटका होणार नाही. पोलिसांना कळविले तर जीव गमवावा लागेल, अशी धमकी आरोपीने दिली. त्यामुळे महिला आणि मुलीची भीतीने गाळण उडाली. रकमेची जमवाजमव करण्यासाठी आरोपीने नातेवाईकांना फोन करण्यास सांगितले. त्यानुसार मुलीने तिच्या काकांना फोन करून या घटनेची माहिती दिली. काकांनी आरोपीला घरातील सदस्यांना काहीही करू नको, तुझी पैशाची व्यवस्था करून देतो, असे सांगून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, कर्णोपकर्णी ही माहिती परिसरात पोहोचल्याने वैद्य यांच्या घरासमोर अल्पावधीतच बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर आरोपीने वृद्ध महिला व मुलीला ओलीस ठेवल्याची माहिती कळताच हुडकेश्वर तसेच आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील ताफा बोलावून घेण्यात आला. गुन्हे शाखेचा पोलीस ताफा, शीघ्र कृती दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले.

आरोपीला पैसे घेण्याच्या बहाण्याने बाहेर काढण्याचे पोलिसांनी प्रयत्न केले; मात्र तो खिडकीतूनच पैशाची मागणी करीत होता. पोलिसांनी कशीबशी शक्कल लढवून त्याला पकडले आणि नंतर बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर त्याची बेदम धुलाई करण्यात आली. यावेळी बघ्यांचा मोठा जमाव त्याच्याकडे धावला. मात्र, जमावाला पिटाळून पोलिसांनी त्याला आपल्या वाहनात घातले. त्याला हुडकेश्वर ठाण्यात नेऊन त्याची पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असतानाच हजारावर नागरिक पोलीस ठाण्याच्या समोर जमले. जमाव ठाण्यात शिरल्यास मोठा गुन्हा घडू शकतो, हे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी त्याला तेथून मेडिकलच्या बहाण्याने त्याला गुन्हे शाखेत नेले. वृत्त लिहिस्तोवर तेथे त्याची चौकशी सुरू होती.

----

दोन तासानंतर सुटकेचा नि:श्वास

आरोपीने तब्बल दोन तास वृद्ध महिला आणि मुलीला ओलीस ठेवले. तो वारंवार त्यांच्या जिवाला धोका पोहोचविण्याची धमकी देत होता. दोन तासानंतर त्याला पोलिसांनी बाहेर काढले. घरातील कोणत्याही महिला-मुलीला कसलीही दुखापत झाली नसल्याचे कळाल्यानंतर पोलिसांसकट सर्वांचाच जीव भांड्यात पडला आणि या थरारक घटनेवर पडदा पडला.

---

Web Title: A woman and a girl were held hostage demanding a ransom of Rs 50 lakh at gunpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.