चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक, अमरावती जिल्ह्यातून घेतले ताब्यात
By नरेश डोंगरे | Published: July 12, 2024 09:17 PM2024-07-12T21:17:27+5:302024-07-12T21:18:14+5:30
चिमुकला सुखरूप पोहचला आईवडीलांच्या कुशित
नागपूर : सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक करण्यात रेल्वे पोलिसांनी आज यश मिळवले. सूर्यकांता विश्वनाथ कोहरे (वय ४०) असे आरोपी महिलेचे नाव असून, पोलिसांनी तिच्या तावडीतून चिमुकल्या बाळाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या आईच्या कुशित सोपविले. महिला आरोपीला नागपुरात आणल्यानंतर रेल्वेचे उपअधीक्षक पांडूरंग सोनवणे आणि वरिष्ठ निरीक्षक मनीषा काशिद यांनी आज रात्री पत्रकारांना या प्रकरणातील घडामोडींची माहिती दिली.
अमरावती जिल्ह्यातील पुसला (वरूड) येथे राहणाऱ्या सूर्यकांताने गुरुवारी सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून ललिता आणि उमाकांत इंगळे (वय ३०) या दाम्पत्याच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले होते. उमाकांतने दिलेल्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता ती नागपूर-वर्धा मेमू ट्रेनमध्ये बाळाला घेऊन बसल्याचे दिसून आले. हा धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता आरोपी महिला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम जवळच्या वरूड रेल्वे स्थानकावर बाळाला घेऊन उतरताना ट्रेनच्या सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्यामुळे पोलिसांनी वरूड गावातील नागरिकांना आरोपी महिलेचा फोटो दाखवून विचारपूस केली असता त्यांनी तिच्याबाबत पोलिसांना अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली.
त्यानुसार, आपल्याला ज्या वरूडला (पुसला) जायचे, ते हे वरूड नसल्याचे सूर्यकांताच्या लक्षात आल्यानंतर तिने वेगळीच शक्कल लढवली. पती खूप दारूडा असून, खायला देत नाही. रोज मारहाण करतो. त्यामुळे मुलाला घेऊन आली. आपल्याला अमरावती जिल्ह्यातील वरूडला जायचे आहे. मात्र, पुरेशी माहिती नसल्याने या वरूडमध्ये उतरली, असे सांगून सूर्यकांताने गावकऱ्यांची सहानूभूती मिळवत त्यांना मदत मागितली. त्यामुळे गावकऱ्यांनी तिला एकूण २५० रुपये जमवून दिले आणि वरूडकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवूनही दिले. मदत मिळवल्यानंतर तिने नातेवाईकाला एक फोन लावून द्या, असे म्हणत तेथील एका व्यक्तीच्या फोनवरून पुसल्यात राहणाऱ्या एकाला फोन केला. शोधाशोध करीत आज सकाळी वरूडमध्ये पोहचलेल्या रेल्वे पोलिसांना ही माहिती कळाली. त्यामुळे पोलिसांनी त्या फोनधारक व्यक्तीकडून पुन्हा पुसल्यातील त्याच व्यक्तीच्या नंबरवर फोन केला. यावेळी सूर्यकांतानेच फोन उचलला. आपण सुखरूप गावात पोहचल्याचे तिने सांगितले. त्या आधारे पोलिसांचे दुसरे एक पथक पुसल्यात पोहचले अन् सूर्यकांताला ताब्यात घेतले. सायंकाळी तिला नागपुरात आणून अटक करण्यात आली.
मातृत्वाने उसळी मारल्यानेच केला गंभीर गुन्हा
आरोपी महिला सूर्यकांता मुळची मुलताई, बैतूल (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. तिला दोन मुली असून, त्यातील एकीचे लग्न झाले आहे. पतीचे निधन झाल्यामुळे तिच्या दुसऱ्या मुलीचा सांभाळ तिची मोठी मुलगी आणि जावई करतो. मोलमजुरी करताना सूर्यकांताची गवंडीकाम करणाऱ्या अक्षय बाबाराव आठनेरे (वय ३२) याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर या दोघांनी दीड वर्षांपूर्वी मंदीरात लग्न केले. गेल्या आठवड्यात ते पुसला, वरूड (जि. अमरावती) येथे राहायला आले. सूर्यकांताचे ऑपरेशन झाले असल्यामुळे ती पुन्हा आई बणू शकत नाही. मुली आणि जावयांची संबंध तोडल्याने तिचे मातृत्व उसळी मारू लागले. त्याचमुळे तिने हा गंभीर गुन्हा केला. दरम्यान, अवघ्या २४ तासात या गुन्ह्याचा छडा लावून अपहृत बाळाला त्याच्या आईवडीलांच्या कुशित सोपविण्याची प्रशंसनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनात आणि ठाणेदार मनीषा काशिद यांच्या नेतृत्वात एपीआय कविकांत चाैधरी, हवलदार संजय पटले, पुष्पराज मिश्रा, शिपाई अमोल हिंगणे, अली, रोशन मोगरे, अमित त्रिवेदी, प्रवीण, खंडारे, महेंद्र मानकर, चंद्रशेखर मदनकर, नीलेश अघम, विशाल शेंडे, सचिन गणवीर आदींनी बजावली.