एका तासात एक कोटींवर ५० लाखांच्या प्रॉफिटचा फंडा, महिलेला घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:50 PM2023-10-21T12:50:15+5:302023-10-21T12:54:02+5:30
पैसे परत मागितल्यानंतर ठार मारण्याची महिलेला धमकी : बॅंक कर्मचाऱ्यासह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : ५० टक्के प्रॉफिटचे आमिष दाखवून एका महिलेला एक कोटीचा गंडा घालण्यात आला. तिने पैसे परत मागितले असता तिला जिवे मारण्याचीदेखील धमकी देण्यात आली. धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. यात एका बॅंक कर्मचाऱ्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वाती किशनचंद रामनानी (३६, जरीपटका) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना ट्रेड प्रॉफिट फंड स्कीम ही गुंतवणुकीची योजना असल्याचे सांगत आरोपींनी जाळ्यात ओढले. स्वाती या जरीपटका येथील ॲक्सिस बॅंकेत नियमितपणे जात होत्या. तेथे कार्यरत दीपांकर सरकार याने त्यांना अमजद खान व चंद्रशेखर रामटेकेसोबत ओळख करून दिली. खानने त्यांना स्कीमची माहिती देत गुंतवणुकीवर ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ते २७ जुलै रोजी मंदार कोलतेच्या साईमंदिराजवळील कार्यालयात घेऊन गेले.
केवळ एका तासात दीड कोटी रुपये मिळतील, अशी बतावणी कोलते व खान यांनी केले. तेथे पांडुरंग इसारकर व प्रमोद कडू हे अगोदरपासूनच उपस्थित होते आणि खानचा मित्र प्रदीपदेखील आला. हे पैसे मुंबईतील कंपनीचे अधिकारी सूरज डे, मंगेश पाटेकर, भरत सुलेमान, अमन पांडे व राजू मंडल यांच्याकडे जातील व तासाभरात दीड कोटी रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून ते पाठवतील असे कोलतेने सांगितले. स्वाती यांचा विश्वास बसावा यासाठी कोलतेने त्यांना सर्व अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांकदेखील दिले. त्यानंतर पैसे बाजूच्या गोदामात ठेवतो, असे म्हणत कोलते व खान तेथून गेले. मात्र, दोघेही बराच वेळ आलेच नाही. सुमारे तीन तासांनी खान परतला व कोलते वैद्यकीय इमर्जन्सीमुळे गेला असल्याचे सांगितले.
तथाकथित अधिकाऱ्यांचे फोन स्वीच ऑफ
दुसऱ्या दिवशी दीड कोटी मिळतील असे आश्वासन आरोपींनी दिले. मात्र, त्यानंतर कोलते याचे कार्यालय सातत्याने बंदच होते, तसेच इतर तथाकथित अधिकाऱ्यांचे फोनदेखील स्वीच ऑफ होते. स्वाती यांनी दीपांकर सरकार व खान यांना वारंवार विचारणा केली. मात्र, ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. खान याने त्यांना आता परत पैसे मागायला आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर स्वाती यांनी धंतोली पोलिस ठाण्यात धाव घेतली व आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर सर्व आरोपींविरोधात फसवणूक व कट रचल्याचा गुन्हा नोंदविला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.