मोबाईलने संसारात लावलेल्या आगीत विवाहितेचा बळी; मुलाचे मातृछत्र हरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 12:05 PM2022-02-21T12:05:03+5:302022-02-21T12:11:14+5:30
शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास असेच झाले. यावेळी मनोजने पूनमला कुणासोबत बोलतेस ते सांग, असा हट्ट धरला. तिने टाळाटाळ केल्याने मनोजने पूनमच्या आई-वडिलांना फोन करून ही बाब सांगितली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पतीच्या अपरोक्ष मोबाईलमध्ये गुंतून राहिलेल्या एका महिलेच्या घरात संशयकल्लोळ वाढला. तो टोकाला गेल्याने त्या महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी भल्या सकाळी ही घटना उघड झाल्यापासून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हुडकेश्वरच्या सद्गुरू नगरात मनोज शिवप्रसाद मेहता (वय ३५) हे राहतात. त्यांचे किराणा दुकान आहे. घरात पत्नी पूनम (३१) आणि छोटा मुलगा असा सुखी संसार. या संसाराला मोबाईलमुळे आग लागली. पती बाहेर गेल्यानंतर पूनम मोबाईलमध्ये गुंतू लागली. घरात आल्यानंतर आणि घरात असतानाही ती मोबाईलवर कुणाशी तरी बोलताना दिसायची. पती जवळ येताच ती फोन बंद करायची. नेहमी कुणासोबत बोलत असते, असे पतीने विचारले. मात्र, पूनम सांगत नव्हती. त्यामुळे मनोजच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला. त्याने पूनमची समजूतही काढली. परंतु, तिचे मोबाईलवरचे बोलणे कमी होत नव्हते.
शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास असेच झाले. यावेळी मनोजने पूनमला कुणासोबत बोलतेस ते सांग, असा हट्ट धरला. तिने टाळाटाळ केल्याने मनोजने पूनमच्या आई-वडिलांना फोन करून ही बाब सांगितली. आपल्या माहेरी मोबाईल संभाषणाची गोष्ट पोहोचल्याने ती क्षुब्ध झाली. या अवस्थेत तिने पती झोपल्यानंतर गळफास लावून घेतला. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पूनम गळफास लावून दिसल्याने मनोजने नातेवाईक, तसेच पोलिसांना कळविले. सहायक पोलीस निरीक्षक कदम यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मनोजच्या तक्रारीवरून तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
मुलाचे मातृछत्र हरवले
या घटनेत दोष कुणाचा, पूनमने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे पोलीस तपासात स्पष्ट होईलच. मात्र, पूनमच्या आत्मघाती निर्णयामुळे तिच्या निरागस मुलाचे मातृछत्र हरविले आहे.