पतीला पाठविला ‘उद्या गुड न्यूज’ मिळण्याचा मॅसेज अन् चिमुकलीला कवटाळून महिलेची तलावात उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 11:03 AM2023-02-01T11:03:35+5:302023-02-01T11:10:49+5:30
महिलेने उचलले टोकाचे पाऊल
नागपूर : आपल्या मुलांच्या जीवनासाठी पालक धडपडताना दिसून येत असताना, दुसरीकडे ताण असह्य झाल्याने नागपुरात एका विवाहितेने स्वत:च्याच मुलीसह आत्महत्या केली. कौटुंबिक कलहामुळे त्रस्त झाल्यानेच तिने तीन वर्षांच्या मुलीसह अंबाझरी तलावात उडी मारून जीव दिला. सोमवारी रात्री ही घटना घडली. कल्पना रवी पंडागळे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या ताणामुळे हसत्या-खेळत्या खुशी या मुलीला जीव गमवावा लागला.
कल्पनाचे २०१८ मध्ये रवी पंडागळेसोबत लग्न झाले होते. तो मूळचा मध्यप्रदेशमधील आमला येथील रहिवासी आहे. दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे व कल्पनाला पतीकडून छळ सहन करावा लागत होता. दोघांच्याही नात्यात दुरावा निर्माण झाला होता. ती पतीपासून वेगळी राय टाऊन येथे राहात होती. तिचे वडील दशरथ बारस्कर हे तिला मदत करायचे. सोमवारी सकाळीच ती घराबाहेर पडली. दिवसभर इकडे-तिकडे गेल्यावर सायंकाळी मुलीला घेऊन ती अंबाझरी तलावाच्या किनारी गेली. तेथे तिने मुलीला खाऊ घातले. त्यानंतर तिने पतीला ‘मॅसेज’ केला व ‘उद्या गुड न्यूज मिळेल’ असे सांगितले. त्यानंतर तिने अंबाझरी तलावात उडी घेतली.
या घटनेची प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना माहिती दिली. अंबाझरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्र असल्याने यश मिळाले नाही. मंगळवारी सकाळी पोलिसांनी गोताखोर व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शोध सुरू केला. अखेर माय-लेकीचा मृतदेह सापडला. आईच्या छातीभोवती कवटाळलेला खुशीचा मृतदेह पाहून पोलिस आणि उपस्थित लोकांचे डोळे पाणावले.
अनेक दिवसांपासून होती ‘डिस्टर्ब’
कौटुंबिक कलहामुळे कल्पना अस्वस्थ होती, मात्र ती एवढं मोठे पाऊल उचलेल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती, अशी भावना तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. वाद वाढल्यामुळे तिचा पती आमला येथे राहायला गेला होता, तर ती एकटी राहायची. तिचे वडील कल्पनाच्या घरी पोहोचले. मात्र ती नसल्याने त्यांनी तिला फोन केला. फोनदेखील बंद असल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली. शेजाऱ्यांनी कल्पना सकाळीच मुलीसह घरातून बाहेर पडल्याचे सांगितले. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने चिंतित झालेल्या बारस्कर यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यांनी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारदेखील दाखल केली. मात्र अखेरीस मुलगी व नातीचा मृतदेहच पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली.
चिठ्ठी लिहून मारली उडी
तलावाच्या काठावर पोलिसांना एक पिशवी सापडली. ज्यामध्ये पती, वडील व काही नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक आणि काही कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्या आधारे अंबाझरी पोलिसांनी कल्पनाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.