मेडिकलच्या दारावरच झाली प्रसूती : मदत मिळण्यापर्यंत झाला उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:36 AM2019-05-14T00:36:11+5:302019-05-14T00:38:32+5:30
ती मेडिकलच्या मुख्य गेटपासून स्वत:ला सांभाळत चालत-चालत सर्जरीच्या अपघात विभागासमोर येताच वऱ्हांड्यातच खाली बसली. प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत होती. तिच्या पतीने स्ट्रेचरसाठी धाव घेतली. त्या महिलेसोबत असलेली दुसरी महिला डॉक्टर-डॉक्टर म्हणून हाका देत होती. त्याच अवस्थेत त्या महिलेची प्रसूती झाली. कुठला पडदा नाही, ‘प्रायव्हसी’ नाही. नंतर परिचारिका, ब्रदर्स धावले. त्यांनी नाळ कापून एका ट्रेमध्ये बाळाला ठेवले, त्या स्त्रीला वॉर्डात भरती केले. हे चित्र कुठल्या ग्रामीण रुग्णालयाचे नाही, तर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकलमधील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ती मेडिकलच्या मुख्य गेटपासून स्वत:ला सांभाळत चालत-चालत सर्जरीच्या अपघात विभागासमोर येताच वऱ्हांड्यातच खाली बसली. प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत होती. तिच्या पतीने स्ट्रेचरसाठी धाव घेतली. त्या महिलेसोबत असलेली दुसरी महिला डॉक्टर-डॉक्टर म्हणून हाका देत होती. त्याच अवस्थेत त्या महिलेची प्रसूती झाली. कुठला पडदा नाही, ‘प्रायव्हसी’ नाही. नंतर परिचारिका, ब्रदर्स धावले. त्यांनी नाळ कापून एका ट्रेमध्ये बाळाला ठेवले, त्या स्त्रीला वॉर्डात भरती केले. हे चित्र कुठल्या ग्रामीण रुग्णालयाचे नाही, तर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकलमधील आहे.
मेडिकलच्या स्त्री रोग व प्रसूती विभागात सध्याच्या स्थितीत ३०० वर रुग्ण भरती आहेत. यातील सुमारे १०० वर रुग्ण प्रसूतीसाठी आहेत. विभागात रोज २० वर प्रसूती होतात. सर्वात गर्दीचा आणि व्यस्त असलेला हा विभाग आहे. अनेक माता वेळेवर प्रसूतीसाठी घरून निघत असल्याने वाटेतच, रेल्वेत, बसमध्ये, ऑटोमध्येच प्रसूत होतात. मेडिकलच्या द्वारावर प्रसूत होण्याचीही ही पहिली वेळ नाही. परंतु दारावर आलेल्या अशा महिलांची सोय व्हावी म्हणून आठ वर्षांपूर्वी दोन कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या नव्या अपघात विभागात प्रसूती कक्षाचाही समावेश करण्यात आला होता. परंतु रुग्णसेवेत अपघात विभाग सुरू होताच या कक्षासह अनेक कक्षांचा विसर पडला. केवळ एक वॉर्ड, किरकोळ शस्त्रक्रिया गृह, नोंदणी कक्ष व डॉक्टरांच्या खोलीपर्यंतच हा विभाग मर्यादित राहिला. इतर खोल्यांमध्ये अपघात विभागाशी संबंधित नसलेले विभाग सुरू झाले. परिणामी, अवघडलेल्या स्थितीत येणाऱ्या मातांची दारावर, व्हरांड्यात प्रसूती होत आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या दरम्यान सर्जरीच्या अपघात विभागाच्या दारासमोर ती महिला प्रसूती वेदनेने विव्हळत होती, तर तिच्यासोबत असलेली महिला मदतीसाठी हाका देत होती. तातडीने कुणीच पुढे आले नाही. ती महिला तिथेच बसली. पती स्ट्रेचर आणण्यासाठी धावला. एका कर्मचाºयाने मदत करण्यापेक्षा हा सर्जरीचा अपघात विभाग आहे, तुम्ही मेडिसीनच्या अपघात विभागात जाण्याचा सल्ला दिला. अपघात विभागातील काही डॉक्टराने ही आपली केस नाही म्हणून दुर्लक्ष केले. तोपर्यंत ती महिला प्रसूत झाली होती. नंतर डॉक्टर, परिचारिका व ब्रदर्स धावले. त्यांनी मिळून पुढील सोपस्कार केले. परंतु हे सर्व करताना आडपडदा ठेवला नाही. सर्व काही उघड्यावरच झाले. हे मेडिकल आहे, येथे काहीही चालत असल्याचा हा प्रकार कधी थांबणार असा प्रश्न या घटनेने उपस्थित केला जात आहे.