नागपूर जिल्ह्यातील आम नदीत नाव उलटून महिलेस जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 08:15 PM2022-01-20T20:15:14+5:302022-01-20T20:16:57+5:30
Nagpur News शेतात जाण्यासाठी नावेत (डाेंगा) बसून आम नदीचे पात्र ओलांडत असताना ही नाव गुरुवारी (दि. २०) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उलटली आणि त्यातील नावाडी शेतमालकासह तीन महिला व दाेन पुरुष मजूर बुडाले.
नागपूर : शेतात जाण्यासाठी नावेत (डाेंगा) बसून आम नदीचे पात्र ओलांडत असताना ही नाव गुरुवारी (दि. २०) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उलटली आणि त्यातील नावाडी शेतमालकासह तीन महिला व दाेन पुरुष मजूर बुडाले. यातील एका मजूर महिलेचा मृत्यू झाला असून, तीन महिला व दाेन पुरुषांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, यातील चाैघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
गीता रामदास निंबर्ते (२६) असे मृत महिलेचे नाव असून, लक्ष्मी गिरी (३२) व परमानंद तिजारे (५०) या दाेघांना नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये, मनीषा राजू ठवकर (३५) व मोनू सुरेश साळवे (२७) यांना कुही येथील ग्रामीण रुग्णालयात आणि मंगला देवराव भोयर (३५) यांना मांढळ (ता. कुही) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात भरती केले असून तेथे उपचार सुरू आहेत. या पाचही जणांची प्रकृती स्थिर व धाेक्याबाहेर असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. ते पाचही जण कुजबा, (ता. कुही) येथील रहिवासी आहेत.
हे सर्वजण परमानंद तिजारे यांच्या शेतात नेहमीप्रमाणे नावेत बसून कामाला जात हाेते. परमानंद तिजारे नावाडी हाेते. नाव पुढे जात असताना अचानक हेलकावे खाऊ लागली आणि काही कळण्याच्या आत उलटली. त्यामुळे नावेतील सहाही जण बुडाले. मंगला भाेयर या ढिवर समाजाच्या असल्याने त्यांचा नेहमीच पाण्याशी संबंध येताे. त्यामुळे त्यांनी बुडताच काठीला पकडले. एवढेच नव्हे, तर त्यांनी इतर महिलांना पाण्याबाहेर काढले. गीता निंबर्ते यांना वाचविण्यात त्यांना यश आले नाही. दाेन्ही पुरुष कसेबसे पाण्याबाहेर आले.
या सर्वांच्या फुफ्फुसात पाणी गेल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास हाेत हाेता. त्यामुळे नागरिकांनी सर्वांना लगेच मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर लक्ष्मी व परमानंद यांना नागपूरला, तर मनीषा व माेनू यांना कुही येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
...