पार्सलसाठी गुगलची मदत घेणे पडले महागात, सायबर गुन्हेगाराने उडविले महिलेच्या खात्यातील १.२९ लाख
By दयानंद पाईकराव | Published: April 5, 2023 04:54 PM2023-04-05T16:54:48+5:302023-04-05T16:55:13+5:30
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : पार्सल पाठविण्यासाठी गुगलची मदत घेऊन त्यावरील क्रमांकावर संपर्क साधला. सायबर गुन्हेगाराने त्यांना एपीके फाईल पाठवून त्या दुसºया क्रमांकावर पाठविण्यास सांगितले अन् महिलेच्या खात्यातील १ लाख २९ हजार ४९७ रुपये काढून तिची फसवणूक केली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २४ मार्चच्या सकाळी १०.१५ ते २७ मार्चच्या दुपारी १.०५ दरम्यान घडली.
कृतिका राजेश रामटेके (२२, चंद्रमणीनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांना पार्सल पाठवायचे असल्यामुळे त्यांनी पार्सल सर्व्हिससाठी गुगलवरून मोबाईल क्रमांक ८२६०४८७४४० मिळविला. या क्रमांकावरून माहिती घेतली असता मोबाईल क्रमांक ९३२१६२१३९९ आणि मोबाईल क्रमांक ९३३९२६१८१२ च्या धारकाने त्यांना दोन एपीके फाईल्स पाठविल्या.
कृतिका यांनी या फाईल दुसऱ्या क्रमांकावर पाठविल्या असता त्यांच्या मोबाईलमधील डेटा शेअर झाला. यात कृतिका यांच्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती आरोपींनी चोरी केली आणि त्यांच्या खात्यातील १ लाख २९ हजार ४९७ रुपये आरोपींनी दुसºया खात्यात वळते केले. कृतिका यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कविता ईसारकर यांनी आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२०, ३४, सहकलम ६६(क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.