सीबीआय, मुंबई क्राईम ब्रांचचा धाक दाखवून महिलेला लाखोंचा गंडा
By योगेश पांडे | Published: May 24, 2023 05:07 PM2023-05-24T17:07:19+5:302023-05-24T17:07:57+5:30
Nagpur News विदेशात जाणारे पार्सल मुंबई विमानतळावर पकडल्या गेल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी एका महिलेला पावणेपाच लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला.
योगेश पांडे
नागपूर : विदेशात जाणारे पार्सल मुंबई विमानतळावर पकडल्या गेल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी एका महिलेला पावणेपाच लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेला घाबरविण्यासाठी आरोपींनी तिला सीबीआय व मुंबई क्राईम ब्रांचकडून कारवाई होईल, असा धाक दाखविला. या जाळ्यात महिला फसली व पैसे गमवावे लागले.
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मुनिबा अलिम (३३, अवस्थीनगर) असे महिलेचे नाव आहे. २२ मे रोजी दुपारी पाऊण वाजताच्या सुमारास त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तुमचे फेडेक्सचे पार्सल मुंबईवरून तायवानला जात असताना कस्टम विभागाने ते थांबविले आहे, असे समोरील व्यक्तीने सांगितले. आपण कुठलेही पार्सल ऑर्डर केले नाही, असे मुनिबा यांनी सांगितले असता समोरील व्यक्तीने कस्टम विभागातील वरिष्ठ अधिकारी अजय सिंग बोलतील, असे सांगून आणखी एका व्यक्तीला फोन दिला. त्या व्यक्तीने स्काईप आयडीवरून मुनिबा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा व सीबीआय नमूद असलेली काही कागदपत्रे दाखविली. त्यात ईडीचादेखील लोगो होता. मुनिबा यांना प्रशासकीय प्रक्रियेची फारशी माहिती नसल्याने त्या या एजन्सीजचे नाव ऐकून घाबरल्या. त्यांनी आरोपींनी पाठविलेल्या लिंकवर बॅंक खात्याचे तपशील दिले. पुढील दीड दिवसांत आरोपींनी त्यांच्या खात्यावरून ४.८२ लाख रुपये दुसऱ्या खात्यांमध्ये वळते केले. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुनिबा यांनी सायबर सेलमध्ये तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.