नागपूर रेल्वेस्थानकावर महिलेने दिला बाळाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 11:22 PM2019-01-10T23:22:57+5:302019-01-10T23:24:55+5:30
फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नीने गुरुवारी सकाळी १०.४० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर बाळाला जन्म दिला. जवळ पैसे नसल्यामुळे या महिलेचा पती बाळंतपणासाठी तिला गावाकडे नेऊ शकला नाही. अखेर रेल्वे सुरक्षा दलाने पुढाकार घेऊन या महिलेस उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नीने गुरुवारी सकाळी १०.४० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर बाळाला जन्म दिला. जवळ पैसे नसल्यामुळे या महिलेचा पती बाळंतपणासाठी तिला गावाकडे नेऊ शकला नाही. अखेर रेल्वे सुरक्षा दलाने पुढाकार घेऊन या महिलेस उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गुन्हे थांबविण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उषा तिग्गा, विकास शर्मा, सुषमा ढोमणे यांना सकाळी १०.४० वाजता उपनिरीक्षक राजेश औतकर यांनी प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची सूचना दिली. महिलेला मदतीची गरज होती. लगेच आरपीएफची चमू महिलेजवळ पोहोचली. त्यांनी महिलेची प्रकृती पाहता त्वरित उपस्टेशन व्यवस्थापकांना सूचना दिली. उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव यांनी लगेच या घटनेची माहिती रेल्वे रुग्णालयाला देऊन रुग्णवाहिका आणि रेल्वे डॉक्टरांना पाचारण केले. बॅटरी कारच्या साह्याने संबंधित महिलेस मेन गेटपर्यंत आणण्यात आले. रेल्वे डॉक्टर सौम्या यांनी महिलेची तपासणी करून तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात पाठविले. दुपारी २ वाजेपर्यंत संबंधित महिला उपचार करून पतीसोबत नागपूर रेल्वेस्थानकावर आली. आरपीएफ जवान विकास शर्मा याने तिच्या पतीची चौकशी केली असता त्याने आपले नाव भोदुलाल भागदीप रा. जयपूर असे सांगितले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी फुगे विकत असून पत्नीला बाळंतपणासाठी गावाकडे नेणार होता, असे सांगितले. परंतु परिस्थिती अभावी गावाकडे जाणे जमले नसल्याने रेल्वेस्थानकावरच प्रसूती झाल्याची माहिती त्याने दिली. या कुटुंबाची नाजूक परिस्थिती पाहून जवान विकास शर्मा याने त्वरित बाळासाठी बाजारातून नवे कपडे आणून त्यांना दिले. पती-पत्नी दोघांनीही आरपीएफने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.