नागपूर रेल्वेस्थानकावर महिलेने दिला बाळाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 08:59 PM2019-02-02T20:59:05+5:302019-02-02T21:01:00+5:30
छत्तीसगड एक्स्प्रेसने नागपुरात आलेल्या एका महिलेला शुक्रवारी रात्री ११ वाजता प्रसुती वेदना सुरू झाल्या. अशातच तिने मेन गेटजळ एका बाळाला जन्म दिला. तिच्या जवळ कपडे नव्हते. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला आर्थिक मदत करून मेयो रुग्णालयात दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्तीसगड एक्स्प्रेसने नागपुरात आलेल्या एका महिलेला शुक्रवारी रात्री ११ वाजता प्रसुती वेदना सुरू झाल्या. अशातच तिने मेन गेटजळ एका बाळाला जन्म दिला. तिच्या जवळ कपडे नव्हते. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला आर्थिक मदत करून मेयो रुग्णालयात दाखल केले.
रुकसाना (३५) रा. सालेकसा ही महिला छत्तीसगड एक्स्प्रेसने नागपुरात आली. तिच्यासोबत तिची आई राबिया होती. संबंधित महिलेस प्रसुतीवेदना होत होत्या. प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर ड्युटीवर असलेले उपनिरीक्षक एस. पी. सिंह यांनी तिची चौकशी केली. तिने आपले नाव रुकसाना (३५) रा. सालेकसा, गोंदिया सांगितले. तेवढ्यात आरपीएफचा जवान विकास शर्मा तेथे आला. महिलेची प्रकृती बाहून बॅटरी कार मागवून महिलेस बॅटरी कारमध्ये बसविण्यात आले. तिला रुग्णालयात नेण्यात येत असताना मेन गेटजवळ महिलेच्या प्रसुती वेदनात वाढ झाली. बॅटरी कार थांबवून आरपीएफच्या महिलांना पाचारण करण्यात आले. विनिता ढिल्लो, कविता कृपाले, रचना आणि गीता कश्यप यांनी महिलेस बॅटरी कारमधून उतरवून प्रसुतीसाठी मदत केली. त्यानंतर आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल, संतोष पटेल, विवेक कनोजिया घटनास्थळी आले. उपस्टेशन व्यवस्थापक दत्तू गाडगे यांनी रुग्णवाहिका बोलावली. काही वेळानंतर रेल्वेचे डॉक्टर, नर्स मेन गेटजवळ पोहोचले. थोड्याच वेळात महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर या महिलेस उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपस्टेशन व्यवस्थापक, कुली, जवानांनी दाखविली माणुसकी
प्रसुती झाल्यानंतर महिलेजवळ बाळाला ठेवण्यासाठी कपडेही नव्हते. ती अतिशय गरीब कुटुंबातील होती. तिची परिस्थिती पाहून घटनास्थळी उपस्थित उपस्टेशन व्यवस्थापक दत्तू गाडगे, आरपीएफचे जवान, कुली, ऑटोचालक यांनी पैसे गोळा करून या महिलेस मदत केली.