दारू विक्री वादातूनच 'त्या' महिलेची हत्या; महिलांमध्ये संतापाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:28 PM2023-02-27T12:28:33+5:302023-02-27T12:30:33+5:30
महिलेने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला होता व त्यातूनच त्याने तिचा ‘गेम’ केला
नागपूर : इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात शनिवारी झालेल्या महिलेच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. आरोपी बादल ऊर्फ राजू हुसेन कुंभरे याने आरती निकोलसची अवैध दारू विक्रीच्या वादातून हत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरतीने बादलविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला होता व त्यातूनच त्याने तिचा ‘गेम’ केला. आश्चर्याची बाब म्हणजे वस्तीमध्ये हिंसक घटना घडू शकते याची कल्पना असताना देखील इमामवाडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कुठलेही पाऊल उचलले नाही, असा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. इमामवाडा पोलिस ठाण्यांतर्गत सुरू असलेल्या विविध अवैध कामांमुळे अगोदरच महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
शनिवारी दुपारी रामबाग परिसरात बादलने शेजारी राहणाऱ्या आरती निकोलसची हत्या केली. पोलिसांनी संबंधित हत्या ही झोपडीच्या वादातून झाल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात अवैध दारूविक्रीवरून दोघांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. बादल रामबागमध्ये अनेक दिवसांपासून घरासमोरच टीनशेड टाकून तो दारू विक्री करीत होता व त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढली होती. शेजाऱ्यांना त्याचा त्रास होत होता. नागरिकांनी याची माहिती अनेकदा पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही व त्यातूनच बादलची हिंमत वाढली.
पोलिस आयुक्तांच्या इशाऱ्याकडेदेखील दुर्लक्ष
या हत्येनंतर नागरिकांमध्ये व विशेषत: महिलांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. दीड वर्षापूर्वी समाजसेवक सुनील जवादे यांच्या हत्येतील गुन्हेगारांनी परिसरातील एका तरुणावर हल्ला केला होता. या घटनेनंतर महिलांनी इमामवाडा पोलिस ठाण्याला घेरावही घातला. महिलांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचीही भेट घेऊन ठाणेदाराला तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. यानंतर पोलिस आयुक्तांनी इमामवाडा पोलिसांना चांगलेच खडसावले होते. मात्र, काही दिवस कडक भूमिका घेतल्यावर परत ‘ये रे माझ्या मागल्या’ असा प्रकार सुरू झाला होता.