मालवाहू बोलेरोच्या धडकेत महिलेचा मृत्यू; नरखेड तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 04:39 PM2022-07-08T16:39:26+5:302022-07-08T16:48:48+5:30
अपघात हाेताच नागरिकांनी देवकाबाईला जखमी अवस्थेत स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घाेषित केले.
मेंढला/जलालखेडा : वेगात आलेल्या मालवाहूू बाेलेराेने पाणी घेऊन जात असलेल्या महिलेला उडवित राेडलगत उभ्या ठेवलेल्या दुचाकीला धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला असून, दुचाकीचे नुकसान झाले. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मेंढला येथे गुरुवारी (दि. ७) रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.
देवकाबाई रामकृष्ण अलाेणे (७८, रा. मेंढला, ता. नरखेड) असे मृत महिलेचे नाव आहे. मेंढला येथील पहिल्या बसस्टाॅपजवळ हॅण्डपंप असून, देवकाबाई त्या हॅण्डपंपचे पाणी आणण्यासाठी गेली हाेती. ती पाणी घेऊन येत असताना मेंढला फाट्याहून मेंढला गावाच्या दिशेने वेगात येत असलेल्या मालवाहू बाेलेराेने (एमएच-४०/बीएल-९४०६) तिला धडक दिली. त्यानंतर त्याच बाेलेराेने राेडलगत पाणीटपरीसमाेर उभ्या ठेवलेल्या रिंकू अशाेक हाके, रा. मेंढला याच्या दुचाकीला (एमएच-४०/सीजी-०१७५) धडक दिली.
अपघात हाेताच नागरिकांनी देवकाबाईला जखमी अवस्थेत स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घाेषित केले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेला. या अपघातात रिंकू हाके याच्या दुचाकीसह चंद्रशेखर वाडबुधे याच्या पानटपरीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी वाहनचालक गजानन भाऊराव चरपे, रा. मेंढला, ता. नरखेड याच्या विराेधात गुन्हा नाेंदवून त्याला ताब्यात घेत वाहन जप्त केले आहे.