नागपुरात भरधाव ट्रकच्या धडकेत महिला ठार, मुलगी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 09:14 PM2019-10-10T21:14:59+5:302019-10-10T21:17:58+5:30
मायलेकीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरून पडून ट्रकखाली चिरडल्या गेलेल्या आईचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. म्हाळगीनगर चौकात गुरुवारी सकाळी ११. ३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मायलेकीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरून पडून ट्रकखाली चिरडल्या गेलेल्या आईचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. म्हाळगीनगर चौकात गुरुवारी सकाळी ११. ३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. सुचिता उमेश कुऱ्हे (वय ४९, रा. घाटे ले-आऊट, हुडकेश्वर) असे मृत महिलेचे तर आचल (वय २६) कुऱ्हे असे तिच्या जखमी मुलीचे नाव आहे.
सुचिता कुऱ्हे आणि त्यांची मुलगी आचल या मायलेकी अॅक्टीव्हाने (एमएच ४९/ एजी ७१५७) गुरुवारी सकाळी महाल येथे खरेदीसाठी जात होत्या. आचल दुचाकी चालवित होती. हुडकेश्वरकडून म्हाळगीनगरकडे जात असताना गांधीबाग सहकारी बँकेसमोर भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरून खाली पडून सुचिता या ट्रकच्या मागील चाकात आल्या. त्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला तर आचल जखमी झाली. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या भीषण अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रकवर दगडफेक करीत तोडफोड केली. ट्रकचालकाला ट्रकमधून खाली खेचून बेदम मारहाण केली. संतप्त नागरिकांनी ट्रकला पेटविण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला. अपघातामुळे या मार्गावरची वाहतूकही विस्कळीत झाली. माहिती कळताच हुडकेश्वर पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. पोलिसांनी संतप्त जमावाची समजूत काढून त्यांना शांत केले आणि जखमी अवस्थेतील ट्रकचालकाची जमावाच्या तावडीतून सुटका केली. नंतर हुडकेश्वर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून आरोपी ट्रकचालक प्रल्हाद परसराम सोनटक्के (वय ४८, रा. शामनगर) याला अटक केली.
खराब रस्ता अन् ट्रकचालकाचा निष्काळजीपणा
म्हाळगी नगर ते हुडकेश्वर या मार्गावर वाहनांची २४ तास वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची स्थिती फारच खराब आहे. जागोजागी खड्डे पडल्याने कसरत केल्यासारखे वाहन चालवावे लागते. नेहमीच छोटे मोठे अपघात घडतात. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे नेहमीच ट्रॅफिक जाम होतो. मात्र, संबंधित प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. त्याचमुळे काही बेपर्वा वृत्तीचे वाहनचालक निष्काळजीपणे वाहन चालवितात. आजही तसाच प्रकार घडल्याने हा भीषण अपघात झाला.
मायेच्या छत्राला बहीण-भाऊ मुकले
मृत सुचिता यांना आचल आणि अमित ही दोन अपत्य आहे. आचल देना बँकेत आधार सेंटर चालविते तर अमित आई सुचिताच्या मदतीने घरीच अगरबत्ती तयार करून विकायचा. आचल आणि अमित वडिलांच्या मायेपासून कधीच पोरके झाले आता ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे मातृछत्रही हरपले. या अपघातामुळे बहीण-भावाला जबर मानसिक धक्का बसला आहे तर, परिसरातही तीव्र शोककळा पसरली आहे.