वकील महिलेने नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्यात घातला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:02 PM2019-07-24T23:02:37+5:302019-07-24T23:03:55+5:30
ओळखीच्या युवकांना ठाण्यात आणल्याच्या कारणावरून वकील महिलेने मंगळवारी रात्रीच्या सुमारास सक्करदरा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून, पोलीसांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आलीआहे. पोलीसांनी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या महिलेने यापूर्वीसुद्धा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलीसांवर आरोप केला होता आणि त्या कारणामुळे, पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील झाल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओळखीच्या युवकांना ठाण्यात आणल्याच्या कारणावरून वकील महिलेने मंगळवारी रात्रीच्या सुमारास सक्करदरा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून, पोलीसांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आलीआहे. पोलीसांनी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या महिलेने यापूर्वीसुद्धा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलीसांवर आरोप केला होता आणि त्या कारणामुळे, पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील झाल्याचे स्पष्ट होत आहे.
मंगळवारी छोटा ताजबाग येथे तीन तरुण नशेमध्ये गोंधळ घालत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांना लागलिच, त्यांना पकडून सक्करदरा ठाण्यात आणले. त्यांच्याजवळ दारूच्या बाटल्याही आढळून आल्या. तिघांचीही चौकशी सुरू असतानाच, एका युवकाने त्याच्या ओळखीच्या असलेल्या एका वकील महिलेला फोन केला. ती वकिलमहिला तात्काळ ठाण्यात दाखल झाली आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी घटनेची माहिती देत असल्यामुळे, वकील महिला नाराज झाली. त्यानंतर, त्या महिलेने ठाण्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि पोलीसांना न्यायालयात नेण्याची व त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देत असल्याचे पोलीस सुत्रांकडून स्पष्ट झाले. दरम्यान, वकील महिलेने स्वत:चे कपडे फाडण्यास सुरुवात केल्याने, पोलीसांचे धाबे दणाणले. महिला कर्मचाऱ्यांनी त्या महिलेस आवरण्यास सुरुवात केली. बºयाच मशाकतीनंतर त्या महिलेवर नियंत्रण मिळविण्यास महिला कर्मचाऱ्यांना यश आले. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाºयांना देण्यात आलीअसून, त्यांच्या निर्देशानुसार सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धकमी देणे आणि दारूबंदी अधिनियमाअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वीही घातला होता गोंधळ
याच वकिल महिलेने यापूर्वीही पोलीसांशी वादविवाद केल्याची माहिती उघडकीस आली आहे. नातेवाईकांना मारहाण केल्याचा आरोप करत, याच महिलेने पोलीसांशी वाद घातला होता. याप्रकरणात काही पोलीस कर्मचाऱ्यांची बदली मुख्यालयात करण्यात आली होती. ताज्या घटनाक्रमाने, वकील महिलेचे खरे रूप पुढे आल्याने, कारवाई झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याची आशा पोलीसांमध्ये बळावली आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद झाला घटनाक्रम
वकील महिलेने घातलेला संपूर्ण गोंधळ ठाण्यात लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने, पोलीस फुटेज वकील महिलेच्या विरोधात पुरावा म्हणून सादर करणार आहेत. सीसीटीव्ही फुटेज असल्याने, आता वकील महिला पोलिसांवर खोटे आरोप लावू शकणार नाही, हे विशेष.
चार दिवसात पोलिसांवर तीन हल्ले
गेल्या चार दिवसात पोलिसांवर हल्ला झाल्याची ही तिसरी घटना आहे. शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत भोसले वाड्याजवळ डीजे बंद केल्याच्या कारणाने, पोलीस पथकावर दगडफेक करण्यात आली होती. त्यात काही पोलीस जखमीही झाले. सोमवारी वाडी येथे कुख्यात गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी करून, गाडीची तोडफोड केली होती. त्यानंतर, हे प्रकरण पुढे आले आहे. पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पोलिसांचा संयमामुळेच, गुन्हेगार आणि प्रभाव असणाऱ्यांनी पोलिसांवरच हल्ला करण्याची हिंमत केली असल्याने, पोलिसांमध्ये या प्रकारांविषयी रोष निर्माण झाला आहे.