स्त्री ही माता, ती प्रतिशोध घेत नाही तर प्रत्युत्तर देते :आशा पांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 07:16 PM2019-10-10T19:16:31+5:302019-10-10T19:24:27+5:30
स्त्रीच्या क्षमता अपार आहेत. ती निर्मिका आहे. ती माता आहे. त्यामुळे, तिला प्रतिशोध घ्यावेसे वाटत नाही. मात्र, कोणत्याही संकटांना, समस्यांना ती नेटाने प्रत्युत्तर देऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आशा पांडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्त्रीच्या क्षमता अपार आहेत. ती निर्मिका आहे. ती माता आहे. त्यामुळे, तिला प्रतिशोध घ्यावेसे वाटत नाही. मात्र, कोणत्याही संकटांना, समस्यांना ती नेटाने प्रत्युत्तर देऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आशा पांडे यांनी केले.
गुरुवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या श्रीमती विमलाताई देशमुख सभागृहात आम्ही लेखिका आणि धनवटे नॅशनल कॉलेजच्या वतीने एकदिवसीय शब्दरंग महिलासाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, संमेलनाध्यक्ष म्हणून पांडे बोलत होत्या. व्यासपीठावर उद्घाटक म्हणून ‘आम्ही लेखिका’चे संस्थापक अध्यक्ष मोहन कुळकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार, मराठी विभाग प्रमुख डॉ. भारती खापेकर, याप्रसंगी जाहीर करण्यात आलेल्या आम्ही लेखिका नागपूर जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर, किरण पिंपळशेंडे, धनश्री पाटील, दीप्ती हांडे, नीता अल्लेवार, वर्षा बोध, मीरा भागवत, डॉ. अर्चना अलोणी व वर्षा देशपांडे उपस्थित होते.
स्त्रियांचे भाव आणि कर्मविश्व शहरी आणि ग्रामीण भागात भिन्न आहेत. शहरातही उच्चभू्र, मध्यमवर्गीय आणि कष्टकरी महिलांशी संवाद साधण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला आहे का? असा सवाल उपस्थित करत, स्त्रियांनी स्त्रियांचे आत्मावलोकन करणे गरजेचे असून, त्यातून व्यक्त होण्याची गरज असल्याचे आशा पांडे म्हणाल्या. निर्मिती हा स्त्रीचा स्वभावधर्म आहे. मग, तिच्याच निर्मिती प्रक्रियेत भोगाव्या लागत असलेल्या समस्या ती का लिहीत नाही, हा विचार लेखिकांना करायचा आहे. स्त्रीनेच स्त्रीला समजून घेणे गरजेचे असून, खऱ्या अर्थाने आता आत्मावलोकनाची गरज आहे. मुले ‘आई तुला काय कळतं’ असे बोलत असल्याचे ऐकायला येत आहे. तुम्हाला काय कळतं, याची जाणिव या जगाला करवून देण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हायचे आहे. या मोबाईल तांत्रिक पिढीला तुम्ही किती मजबूत आहात, याची जाणीव करवून द्यायची आहे. त्यासाठीच लिखाण करण्यास सज्ज व्हावे लागेल. तुम्ही लिहाल तरच ही पिढी ‘आज माझ्या आईला काय हवय’ याचा विचार करेल, असे आशा पांडे यावेळी म्हणाल्या. उद्घाटन सत्राचे संचालन मीरा भागवत, डॉ. अर्चना अलोनी, वर्षा देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक भारती खापेकर यांनी केले. आभार दीप्ती हांडे यांनी मानले.
स्त्री आता चौकटीच्या बाहेर निघाली - मोहन कुळकर्णी
‘आम्ही लेखिका’ संस्थेच्या संकल्पनेची माहिती देताना मोहन कुलकर्णी यांनी स्त्री चूल व मुलाच्या चौकटीतून बाहेर पडली असल्याचे स्पष्ट केले. आता तिच्या लिखाणाला व्यासपीठ आवश्यक असून, हाच संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेची स्थापना एक वर्षापूर्वी झाली असली तरी जगभरातील ५ हजार ७९२ लेखिका या व्यासपीठाशी जोडल्या गेल्याचे म्हणाले.
साहित्यनिर्मितीसाठी समाजाने पुढाकार घ्यावा - सुरेंद्र जिचकार
धर्म टिकविणाऱ्या व संरक्षण करणाऱ्यांच्या पाठीशी ज्याप्रमाणे समाज उभा असतो, त्याचप्रमाणे साहित्य निर्मिती करणाऱ्यांच्या पाठीशी समाजाने सढळ हाताने उभे राहण्याची गरज असल्याची भावना प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार यांनी यावेळी व्यक्त केली.