सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा बळी.. बाळाला विष पाजून मारलं, स्वत:ही प्यायली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 01:51 PM2022-01-16T13:51:12+5:302022-01-16T14:13:20+5:30
सासूसोबत झालेल्या वादातून संतप्त महिलेने आपल्या लहान बाळाला विष जले व स्वत:ही विषप्राशन केले. यात बाळाचा मृत्यू झाला असून महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागपूर : सासू-सुनेचा वाद झाला अन् रागा-रागात महिलेने स्वत: विषप्राशन करून एक वर्षाच्या लहान बाळालाही विष पाजले. यात बाळाचा मृत्यू झाला तर, महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बनपुरी येथे शुक्रवारी (दि. १४) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वेदांत रामकृष्ण धावडे (१) असे मृत बाळाचे नाव असून, प्रणाली रामकृष्ण धावडे (२२, रा. बनपुरी, ता. रामटेक) असे त्याच्या आईचे नाव आहे. रामकृष्ण घावडे हे शेती व्यवसाय करतात. त्याचा तीन वर्षांपूर्वी प्रणालीशी विवाह झाला होता. घटनेच्या दिवशी शुक्रवारी प्रणालीचा घरगुती कारणावरून सासुसोबत वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर प्रणालीने आपल्या सासुला आत्महत्या करण्याची धमकी दिली.
दरम्यान, सायंकाळी वेदांत घरात खेळत असताना, प्रणालीने त्याला जवळ घेतलं आणि विष पाजलं. यानंतर स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मायलेकाला रामटेक शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करत वेदांतला मृत घोषित केलं.
सध्या प्रणालीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व घटनास्थळाचा पंचनामा करत प्रणालीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.