‘मायनिंग’ संशोधनात ‘वूमन पॉवर’
By admin | Published: September 14, 2016 03:09 AM2016-09-14T03:09:14+5:302016-09-14T03:09:14+5:30
सर्वसाधारणपणे ‘मायनिंग’ अभियांत्रिकी हे क्षेत्र पुरुषांसाठीच असल्याचा समज आहे. परंतु चंद्रानी प्रसाद वर्मा यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जात या क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले.
‘मायनिंग’मधील पहिली महिला ‘पीएचडी’ : ‘व्हीएनआयटी’तील चंद्रानी प्रसाद वर्मा यांना मान
नागपूर : सर्वसाधारणपणे ‘मायनिंग’ अभियांत्रिकी हे क्षेत्र पुरुषांसाठीच असल्याचा समज आहे. परंतु चंद्रानी प्रसाद वर्मा यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जात या क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. या क्षेत्राबाबतचा पारंपरिक समज खोटाच ठरविला नाही, तर या क्षेत्रात मौलिक संशोधन करून त्यांनी ‘वूमन पॉवर’ दाखवून दिली. ‘मायनिंग’मध्ये ‘पीएचडी’ प्राप्त करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरणार आहेत. ‘व्हीएनआयटी’तून त्यांनी ‘पीएचडी’ पूर्ण केली असून १४ व्या दीक्षांत समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
चंद्रपूर येथून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. साधारणत: शालेय जीवनात ‘सॉफ्टवेअर’मध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त करण्याचे स्वप्न पाहण्याचे ते दिवस होते. जगभरात ‘सॉफ्टवेअर’ची ‘बूम’ सुरू झाली होती.
कुठल्याही शाखेत प्रवेश मिळू शकत असताना चंद्रानी यांनी रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या ‘मायनिंग’ शाखेत प्रवेश घेतला. १९९९ मध्ये यशस्वीपणे पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी वर्षभर अध्यापनाचे कार्यदेखील केले. परंतु त्यांना ‘मायनिंग’ क्षेत्रातील आव्हाने खुणावत होती. त्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरविले व २००१ मध्ये धनबाद येथील एका खासगी खाणकंपनीत त्या रुजू झाल्या. नोकरी करत असतानाच त्यांनी ‘व्हीएनआयटी’तून ‘एमटेक’ पदवी मिळविली.
‘मानयिंग’ क्षेत्रात संशोधनाला प्रचंड वाव आहे ही बाब त्यांच्या लक्षात आली होती. यातूनच त्यांनी ‘मायनिंग’ तंत्रज्ञानातच संशोधन करण्याचा निर्णय घेतला व यासाठीदेखील त्यांनी ‘व्हीएनआयटी’चीच निवड केली.
‘वेब पिलर्स डिझाईन इन हायवॉल मानयिंग’ हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. ‘व्हीएनआयटी’तील डॉ.एन.आर.थोटे व डॉ.जॉन लुई पी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या विषयात मौलिक संशोधन केले.
१५ सप्टेंबर रोजी अभियंता दिवसाच्या मुहूर्तावरच त्यांना ‘पीएचडी’ प्रदान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
योग्य मार्गदर्शनातून मिळत गेली दिशा
लहानपणापासूनच मला ‘मायनिंग’बाबत उत्सुकता होती. वडील ‘डब्लूसीएल’मध्ये काम करत असल्याने उत्सुकता वाढत गेली. त्यातूनच मी या अभ्यासक्रमात अभियांत्रिकीच पदवी घेण्याचा निर्णय घेतला. ‘मायनिंग’मध्ये ‘पीएचडी’ करणारी मी देशातील पहिली महिला आहे हे मला माहित होते. त्यामुळे आव्हान होतेच. परंतु योग्य मार्गदर्शनातून दिशा मिळत गेली, असे मत चंद्रानी प्रसाद वर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. चंद्रानी या सध्या ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ मायनिंग अॅन्ड रिसर्च’ येथे कार्यरत आहेत.