नागपुरात वटपौर्णिमेनिमित्त मेट्रोची ‘वूमन राईड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:08 PM2018-06-27T23:08:05+5:302018-06-27T23:09:45+5:30
वटपौर्णिमेनिमित्त महामेट्रोने बुधवारी एक अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करीत फक्त महिलांकरिता जॉय राईडचे आयोजन केले. नागपुरातील विविध खासगी संस्था तसेच अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या उपक्रमात सहभागी झाल्या. काही पारंपरिक वेशभूषेत आणि फेटा लावून तर काहींनी पाश्चिमात्य वेशभूषेत अनोख्या राईडमध्ये भाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वटपौर्णिमेनिमित्त महामेट्रोने बुधवारी एक अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करीत फक्त महिलांकरिता जॉय राईडचे आयोजन केले. नागपुरातील विविध खासगी संस्था तसेच अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या उपक्रमात सहभागी झाल्या. काही पारंपरिक वेशभूषेत आणि फेटा लावून तर काहींनी पाश्चिमात्य वेशभूषेत अनोख्या राईडमध्ये भाग घेतला.
वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची मनोकामना करण्याचा हा सण. या दिवशी मेट्रोने स्वत: प्रवास करून कुटुंबीयांनाही असा प्रवास करायला लावून त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घ्यायला लावणार असल्याचे प्रतिपादन यावेळी महिलांनी केले. बुधवारी दुपारी मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ स्टेशनपासून या अनोख्या जॉय राईडला सुरुवात झाली. या सोहळ्यांतर्गत महिलांना वडाच्या झाडाची रोपटी भेट देण्यात आली. एवढेच नव्हे तर महिलांनी चालत्या गाडीत हळदीकुंकूचा कार्यक्रम पार पाडला.
दरवर्षी हा सण साजरा करीत असलो तरीही यावर्षी केवळ महिलांकरिता राईडचे आयोजन करत नागपुरातील महिलांना वटपौर्णिमेच्यानिमित्ताने एक अनोखी भेट दिल्याचे मत राईडमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केले. या उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद असून नागपूरची शान असलेल्या या मेट्रोने महिलांकरिता असे उपक्रम यापुढेही राबवावे, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली.