स्पेनहून नागपुरात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 09:35 PM2021-12-14T21:35:32+5:302021-12-14T21:36:23+5:30
Nagpur News स्पेन प्रवासाची पार्श्वभूमी असलेली ४७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून ‘जिनोम सिक्वेंसिंग’साठी तिचे नमुने पाठविण्यात आले आहेत.
नागपूर : स्पेन प्रवासाची पार्श्वभूमी असलेली ४७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून ‘जिनोम सिक्वेंसिंग’साठी तिचे नमुने पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत विदेशातून आलेल्या ४ प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एकाला ओमायक्रॉन या कोरोनाचा नव्या व्हेरिएंटची बाधा झाली आहे. मंगळवारी पुन्हा कोरोनाच्या ४ नव्या रुग्णांची भर पडली.
स्पेनहून नागपुरात आलेल्या महिलेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही महिला ६ डिसेंबर रोजी नागपुरात आली. ११ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीत ती पॉझिटिव्ह आल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने एम्समध्ये दाखल केले. नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत ४,०४९ तपासण्या झाल्या. शहरात झालेल्या २,७६५ तपासण्यांमधून ३, तर ग्रामीणमध्ये झालेल्या १,२८४ तपासण्यांमधून १ रुग्ण पॉझिटिव्ह आला. कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४,९३,७२४ झाली असून, मृतांची संख्या १०,१२२वर स्थिर आहे. सध्या कोरोनाचे ७३ रुग्ण सक्रिय आहेत. यातील ५९ रुग्ण शहरातील, १३ रुग्ण ग्रामीण भागातील, तर १ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे.