महिलेच्या दुकानातील भाजी रस्त्यावर फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:41+5:302021-05-21T04:09:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी एका पोलीस उपनिरीक्षकाने रस्त्यावर फेकून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी एका पोलीस उपनिरीक्षकाने रस्त्यावर फेकून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश वरिष्ठांनी गुरुवारी जारी केले आहे. कोरोना संसर्गामुळे रस्त्यावर दुकाने लावू नका, गर्दी करू नका, असे महापालिका आणि पोलीस प्रशासन वारंवार सांगत आहे. कारवाईचे इशारेही दिले जात आहे. मात्र रोजच्या जगण्या मरण्याची लढाई लढणारे छोटे छोटे दुकानदार रस्त्यावर दुकाने लावतात. त्यामुळे तेथे ग्राहक गर्दी करतात आणि कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढतो. जरीपटक्यात अशाच प्रकारे एक महिला रस्त्यावर भाजीचे दुकान लावत होती. बुधवारी सकाळी तेथे ग्राहकांची झुंबड उडाली. ते पाहून जरीपटका पोलीस पथकाने तिला बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान दोन वेळा दुकान गुंडाळण्यास सांगितले. मात्र मर्यादित वेळ संपूनही महिलेने दुकान सुरू ठेवल्याने गस्तीवर आलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने तिच्या दुकानातील भाजी अक्षरशः फेकून दिली. या घटनेचा व्हिडीओ गुरुवारी सायंकाळी व्हायरल झाला. त्याची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश दिले. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी या माहितीला दुजोरा दिला असून संबंधित पोलीस उपनिरीक्षक मंगळवारी रात्रभर रात्रपाळी आटोपून परत जात असताना ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
---