नागपुरात महिलेला ट्रकने चिरडले : जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:24 AM2018-03-06T01:24:56+5:302018-03-06T01:25:07+5:30
भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडले. मंगला नारायण धोटे (४५, कापसे चौक, लकडगंज) असे मृत महिलेचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेलिफोन एक्सचेंज चौकात सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. त्यामुळे नागरिकांचा रोष उफाळून आला. जमावाने घटनास्थळावरचे बॅरिकेडस् इकडेतिकडे फेकून सिग्नलचीही मोडतोड केली. जाळपोळही केली. यामुळे चौकातील वाहतूक विस्कळीत होऊन प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडले. मंगला नारायण धोटे (४५, कापसे चौक, लकडगंज) असे मृत महिलेचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेलिफोन एक्सचेंज चौकात सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. त्यामुळे नागरिकांचा रोष उफाळून आला. जमावाने घटनास्थळावरचे बॅरिकेडस् इकडेतिकडे फेकून सिग्नलचीही मोडतोड केली. जाळपोळही केली. यामुळे चौकातील वाहतूक विस्कळीत होऊन प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
मेट्रोच्या कामामुळे या भागातील रस्ते निमुळते झाले आहेत. अनेक दुकानांसमोर वेडीवाकडी पद्धतीने वाहने उभी असतात. प्रचंड वर्दळीचे मार्ग असूनही या भागातील अनेक चौकात, सिग्नलवर वाहतूक पोलीस हजर नसतात. त्यामुळे या भागातील वाहतूक अनियंत्रित झाली आहे. दुसऱ्या चा विचार न करताच वाहनचालक आपली वाहने दामटतात. त्यामुळे या भागातील रस्त्यावर अनेकदा अपघात घडतात. सोमवारी रात्री असेच झाले. मंगला धोटे नामक महिला आपल्या पतीच्या दुचाकीवर बसून दवाखान्यातून घराकडे जात होती. रस्ता पार करीत असताना भरधाव ट्रकचालकाने धोटे दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मंगला खाली पडून ट्रकखाली चिरडल्या गेली. तिचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताच्या वेळी चौकातील सिग्नलवर कोणताही पोलीस कर्मचारी उभा नव्हता. त्यामुळे जमावाच्या भावना तीव्र झाल्या. त्यांनी तेथील बॅरिकेडस् उचलून इकडेतिकडे फेकले. सिग्नलची तोडफोड केली. काही जणांनी विरोध केल्यामुळे जनभावना अधिकच तीव्र झाल्या. त्यामुळे दुकानासमोरच्या वाहनांची जमावाने तोडफोड केली. जाळपोळ करून काही दुकानांवरही हल्ला केला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला, तर अनेक वाहनांना आग लावण्याचे प्रयत्न केला.
पोलिसांकडून बळाचा वापर
या प्रकारामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. प्रचंड तणावही निर्माण झाला. माहिती कळताच लकडगंजचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. बरेच प्रयत्न केल्यानंतर जमाव जुमानत नसल्याचे पाहून त्यांनी अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले. त्यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. जमाव इकडेतिकडे पळाल्यानंतर पोलिसांनी मंगला धोटे यांचा मृतदेह रुग्णालयात हलविला. या अपघातात मंगला यांचे पती नारायण यांनाही दुखापत झाल्याचे समजते. वृत्त लिहिस्तोवर घटनास्थळी प्रचंड तणाव होता.