खुन करून पळणाऱ्या महिलेस साथीदारासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:43 PM2018-06-22T23:43:14+5:302018-06-22T23:43:54+5:30
मुंबईत वृद्ध दाम्पत्याचा खुन करून रेल्वेने फरार झालेल्या महिलेस तिच्या साथीदारासह नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. ही कारवाई नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईत वृद्ध दाम्पत्याचा खुन करून रेल्वेने फरार झालेल्या महिलेस तिच्या साथीदारासह नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. ही कारवाई नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
पार्वती खाता (२८) व सिंघासन मुकुट एक्का (३३) दोन्ही रा. ओडिशा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विमानाने त्यांना मुंबईला नेण्यात आले. मुंबईतील खार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया गोपाळदास मखिजानी (८५) आणि दया माखिजानी (८०) यांचा मुलगा विदेशात राहतो. त्यांचे वय पाहता घरकामासाठी मोलकरीन आणि सांभाळ करण्यासाठी एक महिला होती. त्यांनी अलीकडेच त्या महिलेला कामावर ठेवले होते. गुरुवारी सकाळी कामासाठी आलेल्या बाईने बेल वाजविली असता आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे हत्याकांड उघडकीस आले. मखिजानी दाम्पत्याकडे पंधरा दिवसांपूर्वी ओडिशातील एक महिला कामाला लागली होती. खुनानंतर ही महिला बेपत्ता असल्याने तिच्यावर संशय आला. ही महिला रेल्वेने पळून जाण्याची शक्यता असल्याने लोहमार्ग पोलीस तसेच आरपीएफला सूचना देण्यात आली होती. नागपुरात लोहमार्ग पोलिसांचे पथक मुंबईवरून येणाºया गाड्यांची तपासणी करीत होते. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास गीतांजली एक्सप्रेस नागपूरला आली. या गाडीच्या मागील जनरल कोचमध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या वर्णनाशी मिळतीजुळती महिला आढळली. लोहमार्गचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय पान्हेकर यांना शंका आल्यामुळे त्यांनी त्या महिलेला व तिच्या सोबतच्या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्या दोघांनीच खारमधील वृद्ध दाम्पत्याची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे नागपूर लोहमार्ग पोलिसांनी त्यांना अटक करून खार पोलिसांना याबाबत माहिती दिली. मुंबईचे पोलीस नागपुरला आल्यानंतर ते दोन्ही आरोपींना घेऊन मुंबईला रवाना झाले.
बारा लाखाची बॅग गाडीतच
लोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. मात्र, या धावपळीत त्यांची बॅग गितांजली एक्स्प्रेसमध्ये राहून गेली. या बॅगमध्ये मिखजानी यांच्याकडील जवळपास १२ लाखांचा ऐवज होता. दोघांनाही ठाण्यात आणल्यानंतर बॅग गाडीतच असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानेश्वर नालट यांनी ही बॅग ताब्यात घेऊन नागपूरला पाठविली.