अन् मृत्यूला हरवत परतली आई, दारी उजळले आनंदाचे दिवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 12:23 PM2021-11-01T12:23:58+5:302021-11-01T12:50:41+5:30

Nagpur News : 'ती' गाढ झोपत असताना सापाच्या रुपात 'काळ' आला, तिनदा हाताला चावा घेतला. ती घाबरली, बेशुद्ध झाली. मात्र, डॉक्टरांच्या उपचाराने व स्वत:च्या जिद्दीने तिने मृत्यूलाही हरवले व आपल्या चिमुकल्यांसाठी ती मृत्यूच्या दारातून परत आली. 

woman won the battel of life and death | अन् मृत्यूला हरवत परतली आई, दारी उजळले आनंदाचे दिवे!

अन् मृत्यूला हरवत परतली आई, दारी उजळले आनंदाचे दिवे!

googlenewsNext
ठळक मुद्देकाळ आला पण वेळ आली नव्हती : शर्थीच्या उपचारापुढे मृत्यूही हरलामेडिकलच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाला यश

नागपूर : दोन चिमुकल्यांना कुशीत घेऊन ती झोपली होती. गाढ झोपेत असताना हातावर काहीतरी चावल्याचा भास झाला, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा चावा घेतल्याने ती झोपेतून उठली तर, एक मोठा काळा साप घराबाहेर पडताना दिसला अन् ती तिथेच कोसळली. मेडिकलमध्ये भरती करेपर्यंत प्रकृती गंभीर झाली. सलग १५ दिवस डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि तिचा जीव वाचला. शुक्रवारी रुग्णालयातून घरी जात असताना तिने डॉक्टरांना मिठीच मारली. दोन मुलांसाठी माझा जीव वाचविल्याबद्दल त्यांच्या पाया पडली. दिवाळीत तिच्या दारी आनंदाचे दिवे उजळले.

श्यामकला जगदीश माहुले (३०) रा. खामलापुरी, रामटेक त्या माऊलीचे नाव, तिचा पती सूत गिरणीत कामाला आहे. १३ ऑक्टोबरच्या पहाटे ३.३० वाजताची वेळ श्यामकला पलंगावर आपल्या दोन चिमुकल्यांसोबत झोपली होती. यावेळी हाताला काहीतरी चावल्याचा भास झाला. उंदीर किंवा किडा असेल म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा चावा घेतल्याने ती झोपेतून उठली. खाली झोपलेल्या पती जगदीशला उठविले. काहीतरी चावले म्हणून सांगू लागली. काय चावले म्हणून शोध घेत असताना पलंगाखालून साप घराबाहेर पडताना दिसला. हे बघताचे दोघेही घाबरले. थोड्याच वेळात श्वास घेण्यास अडचण होत असल्याने ती घराबाहेर पडली आणि तिथेच कोसळली.

जगदीशने तातडीने रामटेकच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून इंजेक्शन देत मेडिकलमध्ये तातडीने घेऊन जाण्यास सांगितले. सकाळी ७ वाजता मेडिकलमध्ये पोहोचल्यावर तिला तातडीने अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल केले. विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद व्यवहारे, मेडिसीन विभागाच्या डॉ. चांद यांच्या मार्गदर्शनात डॉ. सृजन खंडेलवाल, डॉ. सजल बंसल, डॉ. स्नेहा, डॉ. रुची, डॉ. रिया, डॉ. मयुरी, डॉ. विशाल, डॉ. प्रशांत, डॉ. देवेंद्र व डॉ. अजिंक्य यांनी सलग १५ दिवस उपचारासाठी अथक परिश्रम घेतले. अखेर १८ दिवसांच्या उपचारानंतर तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

-१५ दिवस व्हेंटिलेटरवर

डॉ. सजल बंसल म्हणाले, श्यामकला हिला विषारी साप ‘मण्यार’ने (कॉमन क्रेट) तीन वेळा दंश केल्याने विष संपूर्ण शरीरात पसरले होते. अत्यंत गंभीर अवस्थेत ती मेडिकलमध्ये आली होती. वाचण्याची शक्यता फार कमी होती. तिला ‘आयसीयू’मध्ये भरती केले. शर्थीच्या प्रयत्नामुळे सलग १५ दिवसानंतर ती व्हेंटिलेटरमधून बाहेर आली. दोन दिवस सामान्य वॉर्डात ठेवल्यानंतर शुक्रवारी सुटी देण्यात आली. जाताना तिने आम्हा डॉक्टरांचे आभार मानत मिठीच मारली. प्राण वाचवून दोन मुलांना पोरके होण्यापासून वाचवल्याबद्दल तिच्या चेहऱ्यावरील आनंद प्रेरणा देणारा ठरला.

-साप चावल्याने तातडीने उपचार गरजेचा

साप चावल्यावर घरच्या घरी काही प्रयोग करण्यात वेळ घालवू नका. वेळ ही सर्वात महत्त्वाची असते. कोणत्याही बाबा किंवा साधूचा सल्ला घेऊ नका. साप मारू नका. डॉक्टरला दाखवायला त्याचा फोटो घ्या व सर्पमित्रांना बोलवा. शक्य तितक्या लवकर रुग्णालयात घेऊन जा. श्यामकला हिला तातडीने आवश्यक उपचार मिळाल्यामुळेच तिचे प्राण वाचले.

-डॉ. मिलिंद व्यवहारे, आयसीयू प्रमुख, मेडिकल

Web Title: woman won the battel of life and death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.