कलाकौशल्यातून महिला बनत आहेत आत्मनिर्भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:35 PM2020-07-25T22:35:58+5:302020-07-25T22:37:37+5:30
पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर होण्याचे केलेले आवाहन अनेकांना भावले आहे आणि त्याच भावनेतून कामे सुरूही झालेली आहेत. राखी पौर्णिमा काहीच दिवसावर येऊन ठेपली आहे आणि हीच संधी साधत राखी बनविण्यासाठी खास देशी पद्धत वापरून महिलांनी आत्मनिर्भर होण्याचा चंग बांधला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संस्कृतीची आभाच अशी आहे की या संस्कृतीत रमलेल्या प्रत्येकाच्या हातात कला व कौशल्य भरभरून आहे. मात्र, काळाच्या ओघात आणि यंत्राच्या वावटळीत हे कौशल्य विरून गेले. मात्र, पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर होण्याचे केलेले आवाहन अनेकांना भावले आहे आणि त्याच भावनेतून कामे सुरूही झालेली आहेत. राखी पौर्णिमा काहीच दिवसावर येऊन ठेपली आहे आणि हीच संधी साधत राखी बनविण्यासाठी खास देशी पद्धत वापरून महिलांनी आत्मनिर्भर होण्याचा चंग बांधला आहे.
कितीही विरोध केला तरी चिनी साहित्यांनी संपूर्ण बाजार व्यापल्याचे नाकारता येणार नाही. राखी हा बहीण-भावाच्या नात्यातील अत्यंत पवित्र सोहळा. अशा सोहळ्यात शत्रू देशाचे साहित्य कशाला वापरायचे? म्हणून पूर्णपणे स्वदेशी साहित्य वापरून राखी बनवायच्या आणि त्याच राख्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायच्या, असा प्रण केला गेला आणि धरमपेठेतील महिलाकला निकेतनच्या सहकार्याने या कार्यास सुरुवात झाली. त्यासाठी गरजू ८-१० महिलांची निवड करण्यात आली. त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आणि त्यांच्याच हातून राखी आणि द्यावयाच्या भेटवस्तूंची निर्मिती करण्यात येऊ लागली आहे. राखी निर्मितीसाठी लोकर, सॅटिन रिबिन, कागद आणि अन्य वेगवेगळे साहित्य वापरले जात आहेत. भेटवस्तूमध्ये पुस्तके, बूकमार्क यासारखे लहान व मोठ्यांना आकर्षिक करतील अशांचा समावेश आहे. राखी आणि भेटवस्तू यांचा कॉम्बो पॅक म्हणूनच अशी निर्मिती केली जात आहे. याच राख्या राखी पौर्णिमेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही पाठविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या राख्या आणि भेटवस्तू पर्यावरणपूरक असल्याने निसर्गाला अनुकूल अशाच आहेत.
आमचा सण आणि राख्याही आमच्याच - मेधा नांदेडकर
राखी पौर्णिमा हा भारतीय सण आहे. मग, विदेशी वस्तूंना या सणासाठी कशाला प्राधान्य द्यायचे. हा सण आमचा आणि या सणाच्या दिवशी खरेदी-विक्री होणाºया राख्या, भेटवस्तू यांच्यावरही भारतीय मातीचाच स्पर्श असायला हवा. म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू केल्याचे महिला कला निकेतनच्या प्रकल्प समन्वयिका मेधा नांदेडकर यांनी सांगितले.