दारूची तस्करी करताना महिलेस नागपूर रेल्वेस्थानकावर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:27 AM2019-03-05T00:27:28+5:302019-03-05T00:28:12+5:30
मादक पदार्थांची तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या अभियानांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमने सोमवारी विदर्भ एक्स्प्रेसच्या लेडीज कोचमध्ये एका महिलेस दारूची तस्करी करताना रंगेहात अटक केली. तिच्या जवळून दारूच्या ९४ बॉटल्स जप्त करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मादक पदार्थांची तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या अभियानांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमने सोमवारी विदर्भ एक्स्प्रेसच्या लेडीज कोचमध्ये एका महिलेस दारूची तस्करी करताना रंगेहात अटक केली. तिच्या जवळून दारूच्या ९४ बॉटल्स जप्त करण्यात आल्या.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, महिला आरक्षक उषा तिग्गा, अर्जुन सामंतराय, विकास शर्मा, अर्जुन पातोडे आणि सुषमा ढोमणे यांनी ही कारवाई पार पाडली. सोमवारी सायंकाळी ५.२५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाची चमू राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत गस्त घालत होती. दरम्यान प्लॅटफार्म क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या १२१०५ विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मागील लेडीज कोचमध्ये एक महिला बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत आढळली. चौकशीत तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. तिला आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांच्यासमोर हजर केले. त्यांनी दोन पंचांसमक्ष महिलेची चौकशी केली असता तिने आपले नाव रमा श्रीराम सहारे (६५) रा. बालाजी वॉर्ड, बल्लारशा सांगितले. तिच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २,६२० रुपये किमतीच्या ९४ बॉटल्स आढळल्या. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी जप्त केलेली दारू आणि महिलेस राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले.