नागपुरात दारूच्या भट्टीवर महिलांचा हल्लाबोल : तोडफोड करून लावली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:39 AM2019-04-18T00:39:06+5:302019-04-18T00:39:49+5:30
असामाजिक तत्त्वांच्या हैदोसामुळे त्रस्त महिलांनी दारूच्या दुकानात तोडफोड करून आग लावली. ही घटना मंगळवारी रात्री कळमन्यातील चिखली वस्तीत घडली. महिलांनी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : असामाजिक तत्त्वांच्या हैदोसामुळे त्रस्त महिलांनी दारूच्या दुकानात तोडफोड करून आग लावली. ही घटना मंगळवारी रात्री कळमन्यातील चिखली वस्तीत घडली. महिलांनी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
चिखली वस्तीमध्ये अनेक दिवसांपासून दारूचे दुकान आहे. परिसरातील महिला सुरुवातीपासूनच येथे दारूचे दुकान उघडण्यास विरोध करीत आहेत. त्यांनी या दुकानाविरुद्ध अनेकदा आंदोलनेही केली. मंगळवारी रात्री ८.३० वाजता चिखली वस्तीत राहणाऱ्या अलका मेश्राम या २० ते २५ महिलांसह दारूच्या दुकानावर पोहोचल्या. त्यांनी दुकान बंद करण्याची मागणी करीत तोडफोड सुरू केली. यानंतर दुकानाला आग लावण्याचा प्रयत्नही केला. घटनेच्यावेळी दुकानातील कर्मचारी प्रकाश तायवडे आपल्या इतर सह कर्मचाºयासह उपस्थित होते. दुकानात अनेक ग्राहक होते. अचानक तोडफोड होत असल्याने ते पळून गेले. तोडफोड केल्यावर महिला परत गेल्या. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. महिलांनी दारूचे दुकान बंद न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे.
दारूच्या दुकानाजवळच झोपडपट्टी आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर मजूर राहतात. सकाळपासूनच दुकानात ग्राहकांची गर्दी होते. पुरुष आपल्या कमाईचा बहुतांश भाग दारूवरच उडवतात. दुकानाजवळ नेहमीच असामाजिक तत्त्वांची मंडळी फिरत असतात. त्यामुळे महिलांना तेथून ये-जा करणे कठीण झाले आहे. महिलांची दिवसाढवळ्या छेडखानी केली जाते. दारूच्या दुकानात येणारे गुंड प्रवृत्तीचे लोक दिवसभर वस्तीत फिरत असतात. त्यामुळे नेहमीच एखादा अनर्थ होण्याचा धोका असतो.
महिलांचे म्हणणे आहे की, त्या या दुकानाचा सुरुवातीपासूनच विरोध करीत आहेत. त्यांना हे दुकान इतर ठिकाणी ‘शिफ्ट’ करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु नंतर या दिशेने कुठलेही पऊल उचलण्यात आले नाही. मागील काही दिवसांपासून महिलांना येथे जगणे कठीण झाले आहे.
महिला स्वत:ला असुरक्षित समजू लागल्या आहेत. लहान मुलांनाही दारू विकली जात आहे. दारुडे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वस्तीमध्ये गोंधळ घालत आहे. दारूसाठी लहान मुलेही आता गुन्हेगारी कृत्य करू लागले आहेत. कळमना पोलिसांना याची माहिती आहे. ते दुकान अधिकृत असल्याचे सांगून कारवाई करीत नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला. महिलांनी दारूचे दुकान तत्काळ न हटविल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे. सध्या कळमना पोलिसांनी अलका मेश्राम आणि इतर महिलांविरुद्ध दंगा व तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.