महिलांनी महिलेकडून जप्त केली दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:08+5:302021-01-02T04:09:08+5:30
भिवापूर : गावातील अवैध दारूविक्रीला कंटाळत अखेरीस स्वत: महिलांनीच एक पाऊल पुढे टाकले अन् दारूविक्री करणाऱ्या महिलेला ताब्यात घेत ...
भिवापूर : गावातील अवैध दारूविक्रीला कंटाळत अखेरीस स्वत: महिलांनीच एक पाऊल पुढे टाकले अन् दारूविक्री करणाऱ्या महिलेला ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. तर दुसऱ्या एका कारवाईत नागपूर येथून दुचाकीने दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दोन्ही घटनांमध्ये ३८,९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
भिवापूर येथील महिलेसह अमन देवानंद बाकडे (२०) रा. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील नागतरोली-नेरी-सावरगाव मार्गावर भिवापूर येथील महिला अवैध दारूविक्री करते. त्यामुळे या गावातील महिला संतापल्या आहेत. याबाबत त्यांनी गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगत कारवाईची विनंती केली. मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे या अवैध धंद्याला अभय कुणाचे, असा शंकेचा प्रश्न उपस्थित होताच गावातील महिलांनीच खुद्द कंबर कसली. दरम्यान, बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास महिलांनी घटनास्थळ गाठत, दारूविक्रेत्या महिलेला दारूसह ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या सुपूर्द केले. तिच्याकडून ८१० रुपये किमतीच्या १८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. यात ललिता तलमले, शोभा धारणे, मंगला तुमडाम, सिंधू चौधरी, भूमिता धारणे, वंदना तलमले, सरिता गजभे, सुनंदा नैताम, सुभाष साखरकर, मोहित तलमले आदी ग्रामस्थांचा सहभाग होता. दुसरी कारवाई पोलिसांनी केली. गुरुवारी दुचाकीने दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी राष्ट्रीय मार्गावरील तास परिसरात पथक तैनात केले. दरम्यान, आरोपी अमन आपल्या मोपेड दुचाकी क्र. एम.एच.३१ एफ.एल. ३७०५ ने नागपूरकडून भिवापूरला येत होता. पोलिसांनी थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मोसंबी फळाच्या बॉक्समध्ये ८,१०० रुपये किमतीची दारू आढळली. दारू व वाहन असा एकूण ३९,१०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात भगवानदास यादव, नरेश बाटबराई, राकेश त्रिपाठी, रवींद्र लेंडे, नरेंद्र पटले यांनी केली.