महिलांना सन्मान मिळावा
By admin | Published: October 3, 2015 03:16 AM2015-10-03T03:16:06+5:302015-10-03T03:16:06+5:30
इंदिरा गांधी, सोनिया गांधी, मायावती असो वा सुषमा स्वराज. त्यांंनी आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य केले.
नितीन गडकरी : ‘बेटी बचाव-बेटी पढाव जनजागृती’ रॅलीला प्रतिसाद
नागपूर : इंदिरा गांधी, सोनिया गांधी, मायावती असो वा सुषमा स्वराज. त्यांंनी आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य केले. आज सर्वच क्षेत्रात महिलांचे कार्य प्रशंसनीय आहे. पण समाज सन्मान देत नाही. महिलांना बरोबरीचा सन्मान मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले. भाजपने देशभरात बेटी बचाव-बेटी पढाव जनजागृती कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यानिमित्ताने नागपुरात भाजपच्या महिला मोर्चातर्फे व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ रॅली आयोजित करण्यात आली.
महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृ ष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, अनिल सोले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, प्रदेश भाजपच्या प्रभारी सरोज पांडे, प्रदेश महासचिव राजेंद्र फडके, प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, महिला मोर्चाच्या अध्यक्ष डॉ. कीर्तिदा अजमेरा व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गोतमारे, रमेश मानकर, महिला मोर्चाच्या ग्रामीण अध्यक्ष सरोजनी तांदूळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. महिलांना बरोबरीचे स्थान मिळाले पाहिजे हा विचार समाजात रुजला पाहिजे. यासाठी जनजागृतीची गरज असल्याने भाजपने देशभरात बेटी बचाव-बेटी पढाव जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. समाजात जागृती येत असून समाजकारण योग्य दिशेने जात आहे. मुलींचा जन्मदर कमी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
नवरात्रोत्सवात कन्या पूजन
नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. तसेच या नवरात्रोत्सवात गावागावात कन्या पूजन करा, असे आवाहन सरोज पांडे यांनी केले. मुलींची संख्या कमी होत आहे. यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. इतर देशात महिलांचा सन्मान होत नाही परंतु आपल्या देशात अशी परिस्थिती नाही. महिलांचा सन्मान व्हावा. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव, बेटी पढाव अभियानाची घोषणा केल्याची माहिती त्यांनी दिली.
महिलांची गर्दी
बेटी बचाव-बेटी पढाव जनजागृती कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यात महाल येथील राजेन्द्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, हिंगणा येथील रेणुका नर्सिंग कॉलेज, बाभुळखेडा येथील रावसाहेब ठवरे विद्यालय, कामठी मार्गावरील युगांतर महिला विद्यालय, सदर येथील युगांतर हायस्कूल आदी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा या कार्यक्रमात सहभाग होता.
बेटी बचावच्या घोषणा देत रॅली
बेटी बचाव-बेटी पढाव अशा घोषणा देत व्हेरायटी चौक ते झाशी राणी चौकादरम्यान रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच विद्यार्थिनींचे लेझीम पथक, दुर्गा देवीचा वेश परिधान केलेली युवती, घोड्यावर बसलेली राणी लक्ष्मीबाई आदींचाही रॅलीत सहभाग होता.