'विदर्भ कन्या' ग्रँडमास्टर दिव्या देशमुख बनली राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 12:02 PM2022-03-03T12:02:09+5:302022-03-03T12:10:10+5:30
भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा T २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १६ वर्षांची 'विदर्भ कन्या' प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने बुधवारी ४७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाचा मान पटकाविला. महिला ग्रँडमास्टर दिव्या विदर्भाची पहिलीच राष्ट्रीय चॅम्पियन ठरली.
महाराष्ट्राचीच साक्षी चितलांगे हिने या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. जेतेपदासह दिव्याला साडेपाच लाख रुपयांचा रोख पुरस्कार मिळाला, शिवाय २५ एलो रेटिंग गुणांची कमाई करता आली. भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा T २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.
जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दिव्याला अखेरची लढत केवळ बरोबरीत सोडविण्याची गरज होती. परंतु, अखेरच्या फेरीत तिने सौम्या स्वामीनाथनवर विजय नोंदवीत पूर्ण गुण वसूल केला. अव्वल मानांकीत वैशाली आर., भक्ती कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गजांना नमवत सलग सात विजयासह दिव्याने नऊपैकी आठ गुण मिळवत जेतेपद पटकावले.
याआधी २०१९ ला दिव्याने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. २०२१ ला वयाच्या १५ व्या वर्षी दिव्याने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झालेल्या न ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत भारताची नवी महिला ग्रँडमास्टर (डब्ल्यूजीएम) होण्याचा मान मिळविला होता.