नागपूरकर महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक हायपरटेन्शनच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 10:49 AM2020-12-22T10:49:27+5:302020-12-22T10:49:51+5:30

Nagpur News Health अतिगंभीर स्वरूपातील रक्तदाब, ज्यावर औषधी घेऊन नियंत्रणात ठेवावा लागतो याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक आहे.

Women in Nagpur are more prone to hypertension than men | नागपूरकर महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक हायपरटेन्शनच्या विळख्यात

नागपूरकर महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक हायपरटेन्शनच्या विळख्यात

Next
ठळक मुद्देपुरुषांमध्ये १८.३ टक्के तर, महिलांमध्ये २१.३ टक्के उच्च रक्तदाब

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अयोग्य जीवनशैलीमुळे अनेकांना गंभीर आजारांची लागण होत आहे. यातून रक्तदाबही सुटलेला नाही. गेल्या काही वर्षात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत लक्षणीय वाढ झाली आहे. धक्कादायक म्हणजे, अतिगंभीर स्वरूपातील रक्तदाब, ज्यावर औषधी घेऊन नियंत्रणात ठेवावा लागतो याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक आहे. राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. नागपुरातील पुरुषांमध्ये याचे प्रमाण १८.३ टक्के तर महिलांमध्ये २१.३ टक्के आहे.

हृदय हा एक स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे आकुंचन पावणे (सिस्टोलिक) आणि प्रसरण पावण्यामुळे (डायस्टोलिक) रक्त शरीरभर फिरत असते. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो, किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ म्हणतात. हा रक्तदाब उच्चस्तरावर म्हणजे, ‘हायपरटेन्शन’मध्ये गेल्यास धोकादायक ठरतो. वाढते वय, आनुवंशिकता, अयोग्य आहार, कमी शारीरिक हालचाली, लठ्ठपणा, जास्त दारूचे सेवन, तणाव आणि झोपेत घोरणे आदी कारणे उच्च रक्तदाबासाठी जोखमीच्या आहेत. हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे हृदय, किडनी, मेंदू आदी महत्त्वाच्या अवयवांचे आरोग्य धोक्यात येते. दर तीन वर्षांनी होणाºया ‘राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात’ नागपुरातील महिला व पुरुषांच्या उच्च रक्तदाबाचे प्रमाण धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

-सौम्य रक्तदाब पुरुष व महिलांमध्ये सारखाच

महिला व पुरुषांमध्ये सौम्य उच्च रक्तदाबाचे प्रमाण सारखेच, म्हणजे १३.२ टक्के आहे. परंतु मध्यम किंवा गंभीर उच्च रक्तदाबाचेही प्रमाण पुरुषांच्या तुलनेत मात्र महिलांमध्ये १.२ टक्क्याने जास्त आहे. पुरुषांमध्ये याचे प्रमाण २.४ टक्के तर महिलांमध्ये हे प्रमाण ३.६ टक्के आहे. अतिगंभीर स्वरूपातील रक्तदाबाचे प्रमाण पुरुषांमध्ये १८.३ टक्के तर महिलांमध्ये २१.३ टक्के आहे.

-मिठाचे सेवन जेवढे कमी तेवढे चांगले

तज्ज्ञांच्या मते, ‘इन्टरसाॅल्ट’च्या एका अभ्यासानुसार मिठाचे सेवन ५ ग्रॅमपेक्षा कमी राहिल्यास ‘सिस्टोलिक ब्लड प्रेशर’ ‘१० एमएम’ आणि‘ डायस्टोलिक ब्लड प्रेशर’ हा ‘५ एमएम’नी कमी होतो. यामुळे उच्चर क्तदाबाच्या रुग्णांनी मिठाचे सेवन जेवढे कमी केल्यास तेवढे चांगले.

-उच्च रक्तदाब एक ‘सायलेंट किलर’

उच्च रक्तदाबामुळे हृदयातील धमन्यांचे आजार (हृदयात ब्लॉकेजेस तयार होणे), मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन (हार्ट अटॅक) आणि कार्डिओमायोपथी (हृदयाची स्पंदने मंदावणे) अशा समस्या उद्भवू शकतात. यातून मेंदूचा झटका (पक्षाघात), मूत्राशयाचे नुकसान (नेफ्रोपॅथी), डोळ्यांची दृष्टी कमी होणे (रेटिनोपॅथी), ‘ब्रेन हॅमरेज ’ आदींचा धोका असतो. प्रत्येकवेळी उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसून येतील असे नाही, यामुळे याला ‘सायलेंट किलर’ म्हणूनही ओळखले जाते. हा आजार वेळेपूर्वी मृत्यूचे किंवा अपंगत्वाचे कारण ठरत असल्याचे हृदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Women in Nagpur are more prone to hypertension than men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य