नागपूर जिल्ह्यात दारुविक्रेत्याच्या घरी जाऊन महिलांनी पकडली दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:48 AM2017-11-18T11:48:57+5:302017-11-18T11:49:28+5:30
रामटेक तालुक्यातील पवनी येथे अवैध दारू विक्री वाढली असताना त्याला आळा घालण्यासाठी स्थानिक महिलांनी कंबर कसली. दरम्यान, महिलांनी पवनी येथील महिला दारूविक्रेत्याच्या घरी धाड टाकून मोहफुलांची दारू व साहित्य पकडले आणि ते देवलापार पोलिसांच्या स्वाधीन केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : रामटेक तालुक्यातील पवनी येथे अवैध दारू विक्री वाढली असताना त्याला आळा घालण्यासाठी स्थानिक महिलांनी कंबर कसली. दरम्यान, महिलांनी पवनी येथील महिला दारूविक्रेत्याच्या घरी धाड टाकून मोहफुलांची दारू व साहित्य पकडले आणि ते देवलापार पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई बुधवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पवनी येथील एक महिला मोहफुलांची दारू विकत असल्याची माहिती पवनी येथील शारदा महिला मंडळाच्या सदस्यांना मिळाली होती. त्यामुळे या मंडळाच्या सदस्य कमला चौधरी, आमना पठाण, शशीकला ताकोत, पार्वती ठाकरे, माया सिरसाम, हिरा उईके यांनी त्या महिलेच्या घरी जाऊन तिला विचारपूस केली. तिने उडवाउडवीची उत्तरे देत घरातून काढता पाय घेतला. मात्र, महिलांनी तिच्या घराची झडती घेतली. त्यात महिलांना घराच्या मागच्या भागात ठेवलेल्या रबरी ट्यूब व कॅनमध्ये मोहफुलांची दारू असल्याचे आढळून आले. परिणामी, महिलांनी लगेच देवलापार पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत संपूर्ण दारू व साहित्य जप्त केले. या कारवाईमध्ये तीन हजार रुपये किमतीची ३० लिटर मोहफुलांची दारू आणि साहित्य जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी दारूविक्रेत्या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून तिचा शोध घेणे सुरू केले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.