भाजपच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले : सुष्मिता देव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:23 AM2019-08-29T00:23:37+5:302019-08-29T00:25:02+5:30
केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आसामच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी येथे केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. आंदोलनकर्त्यांविरोधात सरकारची दडपशाही वाढली आहे. आसाममध्ये एनआरसीच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आसामच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी येथे केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महिलांसाठी नवे धोरण जाहीर केले जाणार आहे. यासंबंधीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे लवकरच सोपविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
प्रदेश महिला काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची, विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी हॉटेल हरदेव येथे पार पडली. तत्पूर्वी त्यांनी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी विधानसभा निवडणुकीत सक्षम महिलांना अधिकाधिक तिकिटं देण्यासोबतच बूथ पातळीवर संघटन मजबुतीची चर्चा करण्यात आली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव.. चा नारा देणाऱ्या सरकारच्याच काळात उन्नावसह इतर घटनांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी हे सरकार महिलांना सुरक्षितता देऊ शकत नसल्याचे पुढे आले. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता हे तीन महत्त्वाचे मुद्दे असून, भाजपचे सरकार या तीनही प्रश्नांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारकडून तळागाळातील महिलांच्या अपेक्षा लेखी स्वरूपात प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता टोकस यांनी यावेळी दिली. महिला काँग्रेस जनादेश पत्राच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांचे मनोबल खचल्याची कबुली देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत तालुका पातळीवर संघटन मजबुतीवर भर दिला जात असून, नव्या पदाधिकाऱ्यांसह पक्ष उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. प्रत्येक जिल्ह्यात महिलांना तिकीट देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, तक्षशीला वागधरे, संध्या लाखे, प्रज्ञा बडवाईक, डॉ. रिचा जैन, शिल्पा जवादे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
काश्मिरातील परिस्थिती जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकार
पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी काश्मिर संदर्भात कधीही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. पाकविरोधात भूमिका घेताना मी सरकारच्या सोबतच असल्याचे त्यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. काश्मिर हा देशातंर्गत विषय असल्याचे काँग्रेस कार्यकारिणीनेही स्पष्ट केले असून काश्मिरात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा राहुल गांधी व देशातील जनतेला अधिकार असल्याचे सुष्मिता देव यांनी स्पष्ट केले.