वाहन चालविण्यात पुरुषांपेक्षा महिलाच ‘परफेक्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:21+5:302021-07-15T04:07:21+5:30
दयानंद पाईकराव नागपूर : कोणतेही जोखमीचे काम असेल तर महिला ते काम करण्यास सक्षम नाहीत, असा पूर्वग्रह बाळगला जातो. ...
दयानंद पाईकराव
नागपूर : कोणतेही जोखमीचे काम असेल तर महिला ते काम करण्यास सक्षम नाहीत, असा पूर्वग्रह बाळगला जातो. त्यातल्या त्यात वाहन चालविण्याच्या बाबतीत तर त्यांना सेन्सच नाही, अशी टर उडविली जाते. मात्र पुरुषांपेक्षा महिलाच परफेक्ट वाहनचालक आहेत, असे म्हणावे लागेल. होय, उपराजधानीत मागील तीन वर्षाची अपघातांची आकडेवारी पाहिली तर महिलाच वाहन चालविण्यात अधिक सजग असल्याचे स्पष्ट होते. कारण तीन वर्षात झालेल्या अपघातांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची हानी चारपट अधिक आहे.
उपराजधानीत दरवर्षी हजारावर अपघातांची नोंद करण्यात येते. यात अनेकजण मृत्युमुखी पडतात, तर काही गंभीर जखमी आणि काही किरकोळ जखमी होतात. परंतु २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये झालेल्या अपघातांकडे नजर टाकली असता महिलांपेक्षा पुरुषांचेच चार पट अधिक अपघात झाल्याचे वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान एकूण १००७ अपघात झाले. यात ४२ महिलांचा मृत्यू झाला तर महिलांच्या पाच पट म्हणजे २०८ पुरुषांचा मृत्यू झाला. २८० महिला जखमी झाल्या तर ७६२ पुरुष जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २०२० च्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान एकूण ७७३ अपघात झाले. यात २८ महिलांचा आणि १८५ पुरुषांचा मृत्यू झाला तर १७६ महिला जखमी झाल्या असून ५७६ पुरुष जखमी झाल्याची माहिती आहे. २०२१ मध्ये १ जानेवारी ते ३१ मे या पाच महिन्याच्या कालावधीत एकूण ३५० अपघात झाले. यात २६ महिलांचा तर ८५ पुरुषांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जखमींमध्ये ८० महिला आणि २८४ पुरुषांचा समावेश आहे. यावरुन पुरुषांपेक्षा महिलाच अधिक सजग राहून वाहन चालवित असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
...................
अशी आहे आकडेवारी.......
वर्ष एकूण अपघात मृत्यू पुरुष/स्त्री जखमी पुरुष/स्त्री
२०१९ १००७ २०८/४२ ७६२/२८०
२०२० ७७३ १८५/२८ ५७६/१७६
२०२१ ३५० ८५/२६ २८४/८०
...............