घरदार सोडून कर्तव्य बजावताहेत महिला पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:49 PM2020-03-28T23:49:14+5:302020-03-29T00:22:49+5:30
कोरोनाच्या काळामध्ये शहरातील ३४० महिला पोलीस पुरुष पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत आहेत. घरोघरी असलेला महिलावर्ग कुटुंबाच्या सेवेत असताना या महिला मात्र समाजाच्या सेवेला अहर्निश वाहून घेताना दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या काळामध्ये शहरातील ३४० महिला पोलीस पुरुष पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत आहेत. घरोघरी असलेला महिलावर्ग कुटुंबाच्या सेवेत असताना या महिला मात्र समाजाच्या सेवेला अहर्निश वाहून घेताना दिसत आहे.
२२ मार्चपासून शहरामध्ये संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हापासून शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा कामी लागली आहे. शहर पोलीस विभागाकडे असलेल्या एकूण मनुष्यबळापैकी सध्या ३४० महिला पोलीस चौकाचौकात १२ तासाची सेवा बजावत आहेत.
एरवी कोणताही सण, प्रसंग, घटना म्हटली की पोलिसांवरच पहिला ताण येतो. आजही कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी संपूर्ण यंत्रणा राबत आहे. यात डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, मीडिया आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या घटकांचा समावेश आहे. मात्र नागरिकांचा सर्वाधिक ताण पोलिसांवर आला आहे. अशाही स्थितीत या विभागातील महिला आपल्या घरची जबाबदारी विसरून सेवेला प्राधान्य देत कर्तव्य बजावत आहेत.
शहरातील चौकांमध्ये सेवा देणाºया या महिला पोलिसांसोबत शनिवारी ‘लोकमत’ने बोलण्याचा प्रयत्न केला असता कोरोनाच्या या दहशतीच्या दिवसातही त्यांची सुरू असलेली सेवा आणि त्याग प्रकर्षाने जाणवला. छत्रपती चौकामध्ये मुख्यालयातील पोलिसांचा स्टाफ तैनात आहे. यामध्ये कीर्ती श्रीवास आणि कृतिका साखरकर या दोन महिला पोलिसांचाही समावेश आहे. श्रीवास या मागील आठ वर्षांपासून सेवेत आहेत. त्यांचे पती अशोक चौकात सलून दुकान चालवितात. घरी १० महिन्यांची लहान मुलगी आहे. सकाळी ९ ते रात्री ९ अशी ड्युटी असल्याने त्या सकाळी ८.३० वाजता घरून स्वयंपाक करून निघतात. रात्री १० वाजेपर्यंत पोहचतात. त्यांची सासू आणि सासरे दिवसभर मुलीला सांभाळतात. लॉकडाऊनमुळे पतीचे दुकान बंद आहे. मुलीला सांभाळण्यासाठी त्यांचीही मदत होत आहे. साखरकर यांची मुलगीही दोन वर्षांची आहे. त्यांचे पतीही शहर वाहतूक शाखेला आहेत. दोघेही सकाळी ८ वाजता घरून निघतात. रात्री १० पर्यंत घरी पोहचतात. दिवसभर सासू-सासरे मुलीला सांभाळतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा हे चक्र सुरू होते. शताब्दी चौकात अजनी पोलिसांचा स्टाफ तैनात आहे. या स्टाफसोबत एक महिला पोलिसही आहे. चार महिन्याचे बाळ असतानाही त्या सेवेत आहेत. या दिवसभराच्या काळात घरची मंडळी बाळाची काळजी घेतात.
मानेवाडा चौकातही अजनी पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे. हा वर्दळीचा चौक असल्याने या काळातही नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ये-जा सुरू असते. या स्टाफसोबत जयश्री ढोक चौकात सेवेला आहेत. घरी भाऊ आणि बहीण अशी मंडळी असतात. सकाळी ९ वाजता हजर राहावे लागते. रात्री ९ वाजता सुटी होते. मागील २९ वर्षांपासून त्या सेवेत आहेत. आजवर अनेक बंदोबस्तामध्ये त्या राहिल्या. मात्र या वेळची बंदोबस्ताची परिस्थिती वेगळी आहे. लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ही सेवा आपण देतोय, देशातील जनतेचे रक्षण करण्याच्या कामी ही सेवा आहे, याचा आनंद असल्याचे त्या म्हणाल्या.
सीताबर्डी चौकामध्ये आठ महिला पोलीस शिपाई आहेत, यासोबतच एक महिला वाहतूक पोलीस शिपाईदेखील आहे. त्यातील अश्विनी परतेकी या १५ वर्षांपासून सेवेत आहेत. पतीही गोंदिया जिल्ह्यात पोलीस विभागातच सेवेला आहेत. तेसुद्धा तिथे या दिवसात सेवेत व्यस्त आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. तिला दिवसभर आईच्या स्वाधीन करून परतेकी कर्तव्यावर हजर असतात. याच चौकातील पॉईंटवर रेखा जुमनाके यासुद्धा आहेत. २७ वर्षांपासून त्या पोलीस सेवेत आहेत. त्याचेही पती पोलिसात होते. ते अलीकडेच निवृत्त झाले. त्यांना तीन मुली आहेत. त्यांच्यावर घर सोपवून त्या दिवसभर चौकातील कर्तव्यावर असतात. समोरील झाशी राणी चौकातही मोहतुरे नावाच्या वाहतूक शिपाई सेवेला आहेत. त्यांच्यासारख्या अनेक महिला आपले घरदार विसरून या आजाराच्या दिवसातही सेवा देत आहेत. आपल्या कामाचा पगार मिळतो म्हणून नव्हे तर ही देशावरची आपदा घालविण्यासाठी आपलाही काही हातभार लागावा यासाठी या महिला पोलिसांची चाललेली धडपड त्यांच्या सेवेतून व्यक्त होत आहे.