नागपूर जिल्हा परिषदेत महिला राज : सदस्यसंख्या ५० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 09:51 PM2020-02-04T21:51:42+5:302020-02-04T21:53:57+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण लागू केल्याने जिल्हा परिषदेसारख्या संस्थेमध्ये महिलांचे वर्चस्व वाढले आहे. खुल्या वर्गातूनही महिला निवडून येत असल्याने महिलांची सदस्यसंख्या ५० टक्क्यांवर गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण लागू केल्याने जिल्हा परिषदेसारख्या संस्थेमध्ये महिलांचे वर्चस्व वाढले आहे. खुल्या वर्गातूनही महिला निवडून येत असल्याने महिलांची सदस्यसंख्या ५० टक्क्यांवर गेली आहे. पदाधिकाऱ्यांमध्येही पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त वाटा मिळाला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित असल्याने, रश्मी बर्वे यांच्या रूपात महिला अध्यक्ष मिळाल्या. पण इतर चार विषय समितींपैकी तीन समितीच्या सभापती पदावर महिलाच विराजमान झाल्या.
५८ सदस्यसंख्या असलेल्या नागपूर जि.प.मध्ये यंदाच्या निवडणुकीत एकूण ३१ महिला निवडून आल्या आहेत. अध्यक्षानंतर समाजकल्याण, महिला व बालकल्याण व इतर दोन सभापती पदासाठी निवडणूक झाली. समाजकल्याण सभापती पद हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते, तर महिला व बालकल्याण हे सभापतिपद महिला सदस्यासाठी राखीव होते. तर इतर दोन विषय समितीची सभापती पदेही खुल्या प्रवगार्तील सदस्यांसाठी राखीव होते. या चारही विषय समिती सभापतींपैकी तीन महिला सदस्यांची सभापती म्हणून निवड झाली.
सहा पदाधिकारी संख्या असलेल्या जि.प.मध्ये चार पदांची जबाबदारी महिला सांभाळणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला सदस्यांची संख्या जास्त असण्याबरोबरच पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांचेच वर्चस्व असल्याने जि.प.मध्ये आता महिला ‘राज’ राहणार आहे.