माझ्याकडे पाठवलेल्या महिलांचा कपडे काढण्याचा प्रयत्न; तुकाराम मुंडे यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:22 AM2020-08-28T02:22:31+5:302020-08-28T06:53:42+5:30

नागपुरात माझ्याविरोधात कुठलेही मुद्दे मिळत नाहीत म्हटल्यानंतर माझ्या चारित्र्यहननाचे प्रकार घडविण्यात आले.

The women sent to me tore their clothes; Tukaram Mundhe sensational allegation | माझ्याकडे पाठवलेल्या महिलांचा कपडे काढण्याचा प्रयत्न; तुकाराम मुंडे यांचा खळबळजनक आरोप

माझ्याकडे पाठवलेल्या महिलांचा कपडे काढण्याचा प्रयत्न; तुकाराम मुंडे यांचा खळबळजनक आरोप

googlenewsNext

यदु जोशी 

मुंबई : मी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणा कमी केला, स्वत:च्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड करणार नाही. तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल, अशी भावना व्यक्त करतानाच नागपूर महापालिका आयुक्तपदावरून माझी बदली व्हावी, असा मी काय गुन्हा केला होता, असा सवाल सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

नागपुरात माझ्याविरोधात कुठलेही मुद्दे मिळत नाहीत म्हटल्यानंतर माझ्या चारित्र्यहननाचे प्रकार घडविण्यात आले. महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेण्याचे प्रकार घडले,असा गौप्यस्फोट मुंढे यांनी केला. दररोज माझ्याविरुद्ध आरोप केले जात होते, पद्धतशीरपणे मला टार्गेट करण्यात आले. माझे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न चारपाच महिने झाले. असे का करण्यात आले? त्यात भाजपचे लोक होते, दुसरे कोण करणार तुम्हीच सांगा, असा सवाल मुंढे यांनी केला. मुंढे सध्या कोरोनाग्रस्त असून नागपुरात होम क्वारंटाइन आहेत. तिथून त्यांनी संवाद साधला.

भाजपला त्रास देण्यासाठी आपल्याला नागपुरात पाठविण्यात आले होते का? तुम्ही भाजपविरोधक आहात का?
मुंढे - अजिबात नाही. मी जिल्हाधिकारी वा आयुक्त म्हणून जिथेही गेलो तिथे प्रस्थापित राजकारण्यांनी मला विरोध केला, त्यात वेगवेगळ्या पक्षांचे नेते होते; पण जनतेने माझे स्वागतच केले. मी कोणाच्याही विरोधासाठी वा बाजू घेण्यासाठी कामच करत नाही. शासकीय अधिकारी म्हणून नि:पक्षपणे काम करतो. सिव्हील सर्व्हंट म्हणून तो माझा रोल आहे. सत्तेच्या मागे धावणे हा आमचा रोल नसतो, काही लोक ते करतात. मी घटनेच्या चौकटीत लोकाभिमुख काम करतो. शासनाचा अधिकारी म्हणून मी काम करतो याचा अर्थ मी कुण्या पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत नाही, असे मी स्वत:चे कधीही होऊ दिलेले नाही. पण माझ्या चारित्र्यहननापर्यंतचे प्रकार घडले हे वेदनादायी आहे.

नागपुरातील लोकप्रतिनिधींनी तुम्हाला समजून घेतलं नाही का? सर्वपक्षीय नेते तुमच्याविरोधात का एकवटले?
मुंढे - समजून घेतलं नाही असं मी म्हणणार नाही, त्यांना मला समजूनच घ्यायचं नव्हतं. सर्वपक्षीय नेते माझ्याविरोधात एकवटले असे मला नाही वाटत. तसे चित्र निर्माण करण्यात आले. भाजप मुख्यत्वे विरोधात होता. मला राजकीय विश्लेषण करायचे नाही.

नागपुरात कुठली कामे केल्याचे समाधान घेऊन आपण जात आहात?
मुंढे - पाच साडेपाच महिने कोरोनातच गेले. देशात केल्या नाहीत अशा कोरोनासंबंधीच्या उपाययोजना मी केल्या. पाच हॉस्पिटल्स रेकॉर्ड वेळेत सुरू केले. बºयाच जणांचे जीव वाचविले. एनजीओंशी समन्वयातून अनेक गोष्टी केल्या. स्वतंत्र मलनि:स्सारण व्यवस्था उभी केली. नागनदी दरवर्षी साफ करून पैसा खर्च करण्यापेक्षा कायाकल्प करण्यावर भर दिला.

व्हॉट इज नेक्स फॉर मिस्टर मुंढे?
मुंढे - सात महिन्यांत मी नागपुरात रिझल्ट दिले. सरकारने बदलीचा आदेश दिला आहे पण खरं सांगू लोकांचा थेट संबंध असलेल्या संस्थांमध्ये काम करणे मला नेहमीच आवडेल.प्रत्येक ठिकाणी किमान दोन वर्षे तरी मिळाली पाहिजेत. कारण समाजात असंख्य नागरी प्रश्न आहेत आणि कुठलाही दबाव सहन न करता काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची तेवढीच आवश्यकता आहे. माझे आईवडील शेतकरी. जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं भलं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान त्यांनी मला दिलं. त्यानुसार मी चालत राहीन.

नागपुरात सत्तारूढ भाजपशी नेमका पंगा काय झाला? तुमचा राजकीय बळी गेला असे तुम्हाला वाटते का?
मुंढे - अनेक गोष्टी होत्या. अनावश्यक बाबी मी बंद केल्या. पावसाळ्यात साडेतीनशे टँकर चालायचे. मी ते निम्म्याहून कमी केले. लोक माझ्यावर खूश का आहेत तर कॉर्पोरेशन इतके चांगले काम करू शकते हे लोकांना पहिल्यांदाच दिसले. म्हणून माझ्या बदलीचा लोक निषेध करताहेत. राजकीय बळी गेला यावर मी भाष्य करणार नाही, मी राजकारणी नाही. मी कोणत्याही नेत्यावर आरोप करणार नाही. जे पटले नाही ते मी आधीही बोललो आहे. मी लोकांसाठीच काम करतो, पण माझीच बदली वारंवार का केली जाते, असा मी काय गुन्हा केला, याचे उत्तर मला मिळत नाही.

Web Title: The women sent to me tore their clothes; Tukaram Mundhe sensational allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.