महिलांनी विचाराने अन् आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे : कांचन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:25 PM2019-04-15T22:25:26+5:302019-04-15T22:27:12+5:30
प्रत्येक महिलेत सुप्तगुण असतात. त्या सुप्तगुणांना व्यवसायात रूपांतरित करण्याची गरज असते. स्वयंपूर्णा संस्थेच्या वतीने अशा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे महिलांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन विचाराने आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे प्रतिपादन स्वयंपूर्णा बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी आज येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक महिलेत सुप्तगुण असतात. त्या सुप्तगुणांना व्यवसायात रूपांतरित करण्याची गरज असते. स्वयंपूर्णा संस्थेच्या वतीने अशा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे महिलांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन विचाराने आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे प्रतिपादन स्वयंपूर्णा बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी आज येथे केले.
स्वयंपूर्णा बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे संचालित आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या वतीने विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात आयोजित ‘मला उद्योजिका व्हायचंय’ मेळाव्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मीनल मोहाडीकर, लघु उद्योग भारतीचे बँकिंग सल्लागार सुधाकर अत्रे, सूक्ष्म, लघु व मध्यम संस्थानचे उपसंचालक के. टी. काळकर, अमरावतीचे उद्योजक किरण पातुरकर, सूक्ष्म, लघु व मध्यम संस्थानचे मनीष झा, सुजाता टाकळकर, धरमपेठ महिला को-आॅप. सोसायटीच्या अध्यक्ष नीलिमा बावणे, स्वयंपूर्णाच्या सचिव विजया भुसारी उपस्थित होत्या. कांचन गडकरी म्हणाल्या, स्वयंपूर्णा संस्थेतर्फे महिलांना मानसिक आधार देऊन स्वयंपूर्ण होण्यासाठी विविध उपक्रम राबविले. नंदनवन परिसरात गरीब महिलांना मानसिक आधार देऊन स्वयंपूर्ण होण्यासाठी मार्गदर्शन केले. महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. संस्थेतर्फे खाद्यपदार्थ, ज्वेलरी, पेपर बॅग तयार करणाऱ्या २० महिलांचे ग्रुप तयार करण्यात आले. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मीनल मोहाडीकर म्हणाल्या, महिलांनी उद्योजिका होताना शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी महिलांनी आॅनलाईन उद्योग आधार काढण्याची गरज आहे. उद्योग सुरू केल्यानंतर उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. सुधाकर अत्रे म्हणाले,कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार आहे. परंतु कर्ज घेताना उद्योजिकांनी आत्मविश्वासाने स्व:तचे विश्लेषण करीत तुम्ही काय करू शकता, हे पटवून देण्याची गरज आहे. के. टी. काळकर यांनी संस्थानतर्फे उद्योजिकांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे सांगून, महिला उद्योजिकांना प्रदर्शनात स्टॉल लावण्यासाठी ८० टक्के खर्च देण्यात येत असल्याची माहिती दिली. किरण पातुरकर यांनी महाराष्ट्रातील पाच हजार महिलांना नि:शुल्क प्रशिक्षण दिल्याचे सांगितले. यावेळी पाच उद्योजिका यांनी आपली यशोगाथा सादर केली. कांचन गडकरी, मीनल मोहाडीकर यांनी आम्ही उद्योजिका याची १९ वी शाखा नागपुरात सुरू केल्याची घोषणा केली, तर यशस्वी ठरलेल्या सात उद्योजिकांचा सत्कार करण्यात आला. संचालन स्नेहल दाते यांनी केले. आभार नीलिमा बावणे यांनी मानले.
मेळाव्याला स्वयंपूर्णा बहुउद्देशीय महिला संस्थेच्या कविता देशमुख, अनघा मुळे, प्रतिभा वैरागडे, कल्पना अडकर, प्रेरणा पांडे, लक्ष्मी नशीने आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.