महिलांनी प्रतिकाराची मानसिकता बाळगावी
By admin | Published: February 28, 2015 02:24 AM2015-02-28T02:24:03+5:302015-02-28T02:24:03+5:30
महिला-मुलींनी प्रतिकाराची मानसिकता बाळगली तर महिलांवरील अत्याचाराला आळा बसू शकतो, असे परखड मत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.
नागपूर : महिला-मुलींनी प्रतिकाराची मानसिकता बाळगली तर महिलांवरील अत्याचाराला आळा बसू शकतो, असे परखड मत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले. सर्वोदय आश्रम आणि नागपूर महिला मंचतर्फे स्वातंत्र्य संग्राम सैनिक दमयंतीबाई धर्माधिकारी स्मृती स्त्रीशक्ती जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत आज सर्वोदय आश्रमात महाविद्यालयीन युवतींच्या चिंतन शिबिरात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मीरा खडक्कार (निवृत्त न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय) होत्या.
चिंतन शिबिरात, महिलांवरील अत्याचार : कारणे आणि उपाय या विषयावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा केल्या जात असल्या तरी पुरुषप्रधान संस्कृतीचाच सर्वत्र वरचष्मा दिसतो. जी महिला किंवा मुलगी पुरुषांच्या सुरात सूर मिसळत असेल ती चांगली. जी नकार देत असेल, प्रतिकार करीत असेल किंवा मतभिन्नता व्यक्त करीत असेल, ती किती वाईट आहे, ते अधोरेखित करण्याची संधी पुरुष मंडळी शोधत असतात. मात्र, सर्वच पुरुष एकसारखेच नसतात, असे स्पष्ट करतानाचा डॉ. गोऱ्हे यांनी महिलांच्या पाठीशी पुरुष कसे भक्कमपणे उभे राहतात, त्याचीही अनेक उदाहरणे सांगितली. निर्भया प्रकरणानंतर महिला हिताचे अनेक कायदे झाले आहेत. त्याची सर्वांना माहिती आणि कडक अंमलबजावणी झाली तर अत्याचाराला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वासही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
निवृत्त न्यायमूर्ती मीरा खडक्कार यांनी अध्यक्षीय भाषणातून समाजाने महिलांवरील अत्याचाराकडे केवळ ‘स्त्रीची समस्या’ या दृष्टिकोनातून बघू नये, असे आवाहन केले. संपूर्ण समाज अत्याचारग्रस्त महिलेच्या पाठीशी उभा राहण्याची गरज त्यांनी विशद केली. बरेचसे अत्याचार दारूच्या नशेत झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे दारुबंदीची कडक अंमलबजावणी व्हायला पाहिजे, असे सांगतानाच अत्याचारग्रस्त महिला-मुलींच्या पाठीशी महिलांनी भक्कमपणे उभे राहून एकीचे बळ दाखवावे, असे आवाहनही केले. अत्याचाराचा विषय येतानाच महिला-मुलींच्या पोषाखाचीही चर्चा होते. त्याचे विश्लेषण करताना खडक्कार यांनी संस्कृतीची जोपासना करून महिला-मुलींनी शालीनता कधीच सोडू नये, असा सल्लाही दिला. प्रारंभी डॉ. रूपा कुळकर्णी यांनी प्रास्ताविकातून पाहुण्यांचा परिचय करून देत चिंतन शिबिराचा उद्देश विशद केला. कार्यक्रमाचे संचालन विशाखा बागडे यांनी तर, आभारप्रदर्शन डॉ. कल्पना उपाध्याय यांनी केले. (प्रतिनिधी)