सदर रोडवर रात्री १२ नंतर थांबवितात महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:08 AM2021-03-27T04:08:22+5:302021-03-27T04:08:22+5:30
नागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील दुकाने सायंकाळी बंद करावी लागत आहेत. परंतु व्यसन करणाऱ्यांना रात्री ...
नागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील दुकाने सायंकाळी बंद करावी लागत आहेत. परंतु व्यसन करणाऱ्यांना रात्री १२ वाजताही सदर परिसरात पान, गुटखा व सिगारेट सहज उपलब्ध होत आहेत. या रस्त्यावर महिला येणाऱ्या-जाणाऱ्यांना इशारे करून थांबवत पान, सिगारेट घेण्यासाठी विचारणा करतात. रात्री उशिरा महिलांकडून थांबविण्यात येत असल्याने लोकसुद्धा भितात.
या महिला नटूनथटून कधी एनआयटी चौक, लिबर्टी चौक, व्हीसीए चौक, माऊंट रोड तर कधी स्मृती टॉकीज चौकात दुचाकी घेऊन उभ्या असतात. त्यांच्या शोधात शहरातील युवक टोळीने परिसरात फिरतात. त्यामुळे सदर परिसरात रात्रीला समूहांनी बसलेले सिगारेटचा धूर सोडणारे युवक जागोजागी दिसतात. दरम्यान, पोलिसांचे वाहन दिसताच हे युवक गाड्या घेऊन पसार होतात. महिलासुद्धा आपली दुचाकी घेऊन पुढे जाते. पोलीस गेल्यानंतर पुन्हा आपली गाडी घेऊन ती सक्रिय होते.
- पहिले विकत होती परफ्यूम
स्थानिक लोकांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी ही महिला याच परिसरात रात्री ११ नंतर परफ्यूम विकायला निघत होती. परंतु पोलिसांच्या कारवाईमुळे ती गायब झाली होती. आता पुन्हा सक्रिय होऊन सिगारेट विकून मोबाईल नंबर देत फिरत असते.
- नक्कीच कारवाई करू
सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष बकाल म्हणाले की पोलिसांनाही यांची माहिती पडली आहे. परंतु महिला केवळ सिगारेट विकत असल्याची माहिती आहे. असे असले तरी लॉकडाऊनच्या नियमांतर्गत कारवाई करण्यात येईल.