दारू, गांजा विक्रीमुळे महिला असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:36+5:302021-08-18T04:12:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क टाकळघाट : बुटीबाेरी एमआयडीसी परिसरात असलेल्या भारकस (किरमिटी) येथे अवैध दारू व गांजा विक्री, जुगार, मटका ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
टाकळघाट : बुटीबाेरी एमआयडीसी परिसरात असलेल्या भारकस (किरमिटी) येथे अवैध दारू व गांजा विक्री, जुगार, मटका यासह अन्य अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली आहे. व्यसनी व असामाजिक लाेकांमुळे स्थानिक महिला व तरुणींना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांना असुरक्षित वाटायला लागले आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांना कायम आळा घालण्याची मागणी भारकस (किरमिटी) येथील महिलांसह नागरिकांनी केली आहे.
भारकस (किरमिटी) येथील मुख्य रस्ता व चौकाचौकात बऱ्याच दिवसापासून अवैध धंदे सुरू आहेत. दारू पिणारे व गांजा ओढणारे रस्त्याने सतत फिरत असून, सार्वजनिक ठिकाणी जुगार व मटका खेळला जाताे. ठिकठिकाणी माेहफूल व देशीदारूची तसेच गांजाची खुलेआम विक्री केली जाते. या गावात व परिसरात कामगार माेठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. महिला कामगारांना कामावर जाताना व घरी परत येताना तसेच इतर महिला व तरुणींना गांजा व दारू पिणाऱ्यांचा त्रास सहन करावा लागताे.
परिणामी, येथील सर्व अवैध धंदे कायमचे बंद करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य आतिष उमरे, सूरज नानवटे, धीरज गायकवाड, तक्षक बुलकुंडे, चेतन गावंडे, आकाश गावंडे, पवन गायकवाड, रजत गावंडे, चेतन उरकुडे, सूरज गावंडे, पंकज गावंडे, आकाश गावंडे, किरण गावंडे, वैभव नानवटे, प्रणय गायकवाड, नागेश उके, मयूर पेंदाम, पवन उके, सोनू मेश्राम, निखील गायकवाड, आकाश धोटे, सुबोध नानवटे यांनी केली असून, एमआयडीसी बुटीबाेरीचे ठाणेदार विनाेद ठाकरे यांना निवेदन दिले आहे.
...
मारहाण, भांडणे वाढली
गावातील बहुतांश तरुण व्यसनांच्या आहारी गेल्याने ते दारू व गांजाच्या नशेत राेडने झिंगलेल्या अवस्थेत सतत फिरत असतात. काही तरुण चाैकाचाैकात व राेडलगत मटका व जुगार खेळत बसलेले असतात. या व्यसनी तरुणांनी आईवडिलांनी पैसे न दिल्यास ते भांडणे करीत असल्याने येथे भांडण व मारहाणीचे प्रमाणही वाढले आहे.
...
पाेलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
पाेलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांचे अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक संबंध असल्याने पाेलीस त्यांच्यावर कधीच प्रभावी कारवाई करीत नाही. त्यामुळे या भागातील अवैध धंद्यांमध्ये वाढ हाेत असल्याचा आराेप जिल्हा परिषद सदस्य आतिष उमरे यांनी केला आहे. त्यामुळे एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे या भागातील काेणत्याही अवैध धंदेवाल्याची कधीच गय केली जाणार नाही. त्यांच्यावर तातडीने कारवाई करू, अशी प्रतिक्रिया ठाणेदार विनाेद ठाकरे यांनी व्यक्त केली.