नागपूर ग्रामीण भागातील महिला चालविणार टॅक्सी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 07:46 PM2017-12-05T19:46:54+5:302017-12-05T19:59:38+5:30
ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ नागपूर जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे दिले जात आहे. अल्पशिक्षित असणाऱ्या महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाने पहिल्यांदाच या प्रशिक्षणाचे आयोजन केले असून, जिल्ह्यात जवळपास ७५० महिला प्रशिक्षण घेऊ शकणार आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ नागपूर जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे दिले जात आहे. अल्पशिक्षित असणाऱ्या महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाने पहिल्यांदाच या प्रशिक्षणाचे आयोजन केले असून, जिल्ह्यात जवळपास ७५० महिला प्रशिक्षण घेऊ शकणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराला प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. वैयक्तिक लाभाच्या योजनेतूनही महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन अनुदानावर दिली जाते. ब्युटी पार्लर, शिवणकामासारखे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार करण्यास महिला व बाल कल्याण विभागातर्फे प्रवृत्त केले जाते. शासनाने पहिल्यांदाच विभागाच्या माध्यमातून महिलांना चारचाकी वाहनांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ही योजना राबविण्यात येत असून, जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एक महिन्याचे हे प्रशिक्षण असून, लाभार्थी महिलेचे वय १८ वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुक्यात ६० महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून लाभार्थी महिलेचा शोध घेऊन, विभागातर्फे त्यांची निवड करण्यात येणार आहे.
ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणारी संस्था तालुक्यातील मोठ्या गावात जाऊन महिलांना प्रशिक्षित करणार आहे. प्रशिक्षणानंतर वाहन चालविण्याचा परवानादेखील देण्यात येणार आहे. विभागातर्फे लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू असून, पुढच्या महिन्यापासून महिलांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.
शहरातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. ग्रामीण भागात पुरुषांच्या व्यवसायात महिलांचा सहभाग नगण्यच असतो. शासनाने ग्रामीण भागातील महिलांसाठी हा नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून महिलांना संधी दिली आहे. ग्रामीण भागात महिला व्यवसायात असल्या तरी एक पारंपरिक स्वरूपाचा त्यांचा व्यवसाय असतो. परंतु ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा टॅक्सीचा व्यवसाय करू शकतात.
पुष्पा वाघाडे
सभापती, महिला व बाल कल्याण विभाग