उपराजधानीत दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी महिला तक्रार विशेष दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:31 PM2020-03-06T12:31:28+5:302020-03-06T12:32:27+5:30
महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी आणखी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिला तक्रार विशेष दिवस हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी आणखी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिला तक्रार विशेष दिवस हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. प्रत्येक महिन्यात दुसºया व चौथ्या मंगळवारी हा उपक्रम राबविला जाणार असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त तसेच पोलीस आयुक्त स्वत: महिला-मुलींच्या तक्रारी ऐकणार आहेत. त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जाणार असून, त्यांना कसा दिलासा मिळेल, त्यासाठी उपाय केले जाणार आहेत.
हे (नागपूर) माझे शहर आहे. ते सर्वात सुरक्षित असून, येथील पोलीस माझ्या सुरक्षेसाठी, मदतीसाठी तत्पर आहे, अशी भावना उपराजधानीतील महिला-मुलींमध्ये निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी हा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. महिन्यातील दुसºया आणि चौथ्या मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत महिला तक्रार विशेष दिवस आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी आलेल्या महिला-मुलींच्या तक्रारी ऐकून त्याचे प्रभावी निराकरण करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गृहराज्यमंत्र्यांकडून प्रशंसा !
शहर पोलिसांनी त्यांच्या व्टिटर अकाऊंटवर या उपक्रमाची माहिती टाकताच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी रिव्टिट करून ‘एक अत्यंत स्तुत्य उपक्रम’ म्हणून प्रतिक्रिया नोंदवली आहे. या उपक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्याकडे ठिकठिकाणाहून अनेकांनी संपर्कही साधला आहे.
होम ड्रॉपचे कौतुक
यापूर्वी शहर पोलिसांनी महिला-मुलींसाठी ‘होम ड्रॉप’ हा उपक्रम सुरू केला. तो नागपूरच नव्हे तर राज्यभर प्रशंसेचा विषय ठरला होता. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांचे राज्यतील अनेक सामाजिक संघटना आणि विशेषत: महिला संघटनांनी कौतुक केले होते. हा उपक्रम राज्यातील ठिकठिकाणच्या शहरात पोलिसांनी सुरू करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या.