Women's Day 2019; लोकसेवेचे प्रशासकीय ‘सेवा’व्रत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:41 AM2019-03-08T10:41:28+5:302019-03-08T10:43:15+5:30
मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण नागपूरच्या प्रशासकीय क्षेत्रात एक डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.
आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण नागपूरच्या प्रशासकीय क्षेत्रात एक डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नागपूरच्या उपविभागीय अधिकारीपासून ते भूसंपादनापर्यंतच्या अनेक विभागाची जबाबादरी यशस्वीपणे सांभाळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांना नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रमुख अधिकारी म्हणून जबाबदारी दिली. ही जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. महिला दिनानिमित्त आशा पठाण यांच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. आशा पठाण या मूळच्या बुलडाण्याच्या. एका मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील मुख्याध्यापक होते. घरचे वातावरण अतिशय संस्कारी आणि पुरोगामी होते. आशा या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्या काळात पाचगणी येथील संजीवन विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावयाची होती.
चौथ्यावर्गानंतर त्यांनी ही राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना पाचगणीत प्रवेश मिळाला. दहावीपर्यंत त्या पाचगणीत शिकल्या. ११ वी व १२ वी पुन्हा बुलडाण्यात केले. अमरावतीच्या शासकीय इंजिनियरिंग कॉलेजमधून त्यांनी बी.ई. कॉम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर एक वर्ष लेक्चरशिप केले. दरम्यान, त्यांनी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. तहसीलदार म्हणून त्या निवडल्या गेल्या. दुसऱ्या वर्षी पुन्हा त्यांनी परीक्षा दिली आणि त्या उपजिल्हाधिकारी झाल्या. नागपूर येथे विशेष भूसंपादन अधिकारी, गोसेखुर्द, मिहान, एमआयडीसी, नॅशनल हायवे, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले. उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली तेव्हा अनेकांना वाटले की एक महिला अधिकारी या पदाला न्याय देऊ शकेल की नाही. परंतु त्यांनी आपल्या कामाने सर्वांनाच आपलेसे केले. आजही त्या तशाच निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करतात.
महिलांना घर आणि नोकरी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते, ही बाब खरी आहे. परंतु महिला अधिकाऱ्यांकडे पाहण्याची पूर्वीसारखी परिस्थिती आज राहिलेली नाही. प्रशासकीय सेवेतील किंवा नोकरी करणाºया महिलांनी केवळ त्या महिला आहेत म्हणून कारण सांगू नये. कारण ते काम त्यांनी स्वत:हून निवडलेले आहे.
कुणीही त्यांना या क्षेत्रात या म्हणून जबरदस्ती केलेली नाही. तेव्हा मिळालेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी स्वीकारावी. घरी असाल तर घरातील संपूर्ण जबाबदारी पार पाडा आणि कामावर असाल तर तेथील जबाबादारी पूर्ण करा. उलट महिलांनी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी नोकरी करणाºया महिलांना केले आहे.