Women's Day 2019; बळीराजासाठी ‘रेशीम’बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:05 AM2019-03-08T10:05:50+5:302019-03-08T10:08:27+5:30
‘करा रेशमाची शेती, पिकवा मातीतून मोती’ असा नारा देत ५,००० शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याची हमी दिली. त्यांचा दावा आहे की, रेशीमच्या उत्पादनातून विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती नक्कीच सुधारू शकते.
मंगेश व्यवहारे
लोकमत न्यूज नेटवर्क
विदर्भातील शेती आणि शेतकरी, आत्महत्यांमुळे देशपातळीवर चिंतेचा विषय ठरतो आहे. अशावेळी एखाद्या अधिकाऱ्याला जेव्हा शासन अशा अवघड परिस्थितीत काम करण्यास पाठविते, तेव्हा शेती कशी टिकवावी, शेतकरी कसा जगवावा, हे मोठे आव्हान त्याच्यापुढे असते. या आवाहनाला मूळच्या विदर्भातील असलेल्या भाग्यश्री बानाईत धिवरे या अधिकाऱ्यानी लीलया पेलले. ‘करा रेशमाची शेती, पिकवा मातीतून मोती’ असा नारा देत ५,००० शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याची हमी दिली. त्यांचा दावा आहे की, रेशीमच्या उत्पादनातून विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती नक्कीच सुधारू शकते.
नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या भाग्यश्री बानाईत या शिक्षिकेचा रेशीम संचालनालयाच्या संचालकापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, सहायक आयुक्त म्हणून निवड झाली. तर भारतीय प्रशासन सेवेत २०१२ च्या बॅचमध्ये एकमेव महाराष्ट्रीय महिला म्हणून त्यांची निवड झाली. महाराष्ट शासनाची उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आयुक्त म्हणून सेवा केली. नागालॅण्ड सरकारच्या गृह विभागाच्या उपसचिव म्हणून त्या कार्यरत होत्या. प्रशासनाच्या दीर्घ अनुभवानंतर त्यांना आपल्या मातीत काम करण्याची संधी शासनाने दिली. सप्टेंबर २०१८ मध्ये त्या रेशीम संचालनालयाच्या संचालक पदावर नियुक्त झाल्या.
समाजाची शेतीकडे बघण्याची भावना दुय्यम झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारीपणा, शेतीच्या उत्पादनाला मिळणारा अत्यल्प बाजारभाव यामुळे शेतीक्षेत्रात उदासीनतेचे वातावरण आहे. अशात रेशीम शेती कशी टिकेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, यासाठी त्यांनी नाविन्यपूर्ण विविध योजना आखल्या. त्यात रेशीम रथ यात्रा काढली. रेशीम शेती उद्योगावर दिनदर्शिका काढली. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना तंत्रज्ञान अवगत होण्याच्या दृष्टीने रेशीम माहिती पुस्तिका प्रकाशित केली. महारेशीम अभियान राबविले. अहिंसा सेल, रेशीम ग्राम संकल्पना राबविली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम वस्त्रांचा फॅशन शो करविला. सोलापुरात रेशीम बाजारपेठेची निर्मिती केली. त्यांनी रेशीम शेती उद्योगाला पूर्ण कृषीचा दर्जा मिळवून देण्यासाठी समिती गठित केली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे पाठपुरावा करून इतर शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ रेशीम शेतकऱ्यांना मिळणार आहेत. रेशीम टुरिझम, स्वतंत्र रेशीम भवन निर्मितीसाठी त्यांचा प्रयत्न आहे. अवघ्या काही महिन्यातच त्यांनी राबविलेल्या नवनवीन संकल्पनेमुळे संचालनालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदा केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य रेशीम संचालनालयाला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख अपारंपरिक राज्याचा पुरस्कार प्रदान केला आहे.
प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षण अमरावती, यवतमाळ या पट्ट्यांमध्ये झाले आहे. त्यामुळे येथील शेती, शेतकऱ्यांच्या अवस्थेचा चांगला अभ्यास आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या डोळ्यांनी पाहिल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रति जाणीव आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी काम करण्याची जी संधी दिली आहे, त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. माझ्या कार्यकाळात रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, हा प्रयत्न राहणार आहे.
- भाग्यश्री बानाईत धिवरे, संचालक, रेशीम संचालनालय