दु:खाचा डोंगर कोसळला, मात्र ती रडली नाही, शिकली अन कुटुंबाचा आधार झाली!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 10:32 AM2023-03-08T10:32:30+5:302023-03-08T10:41:53+5:30
काेवळ्या वयात पती निधनाचे दु:ख पचवून सावरला संसार
निशांत वानखेडे
नागपूर : ती अवघ्या २३ वर्षाची... लग्नाला उणे-पुरे दाेनच वर्ष झाले हाेते आणि संसाराच्या वेलीवर एक सुंदरसे फुल फुलले हाेते. सुखासीन संसाराला जेमतेम सुरुवात झाली हाेता आणि स्वप्नरंजनाच्या वयातच नियतीने पतीला हिरावून तिच्यावर माेठा आघात केला. समाेर अख्ख आयुष्य असताना डाेळ्यापुढे अंधार दाटावा, अशी अवस्था. पण रडत बसणे किंवा नवा संसार थाटण्यापेक्षा तिने हेच प्राक्तन स्वीकारले. ती शिकली आणि पुन्हा नव्या दमाने उभी राहिली. कुटुंबाला सांभाळले अन् मुलाला उच्च शिक्षित करून पायावर उभे केले.
असे म्हणतात की, महिला या पुरुषांपेक्षा अधिक मजबूत असतात आणि वेळ आली तर काेणत्याही संकटाचा खंबीरपणे सामना करण्यासाठी तयार हाेतात. सीमा नाकाडे यांच्या आयुष्याची हिच कथा आहे. सीमा यांचे २१ व्या वर्षी लग्न झाले तेव्हा जेमतेम पदवीचे शिक्षण झाले हाेते. पती खासगी व्यवसाय करायचे. सर्वकाही सुरळीत चालले हाेते. मुलगा झाला अन् त्यांच्या संसाराचा परीघ पूर्ण झाला. मात्र सीमा यांच्या सुखी संसाराला काळाची नजर लागली.
अवघ्या दाेनच वर्षात ब्रेन हॅमरेजने पतीचे निधन झाले. जेमतेम दाेन महिन्याचा मुलगा, बापाच्या प्रेमाचा स्पर्श हाेण्यापूर्वीच पितृछत्र हरपले. सीमा यांच्यावर तर काेवळ्या वयात नियतीने माेठा आघात केला. अशा विपरित परिस्थितीत कुटुंबाचे पाठबळ मिळाले. खचून न जाता सीमा यांनी दु:ख बाजूला ठेवून आधी अर्धवट सुटलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. डाेक्यावरचा पदर कमरेला बांधून त्या उभ्या ठाकल्या, मुलासाठी... कुटुंबासाठी...
संकटे येतील, वेळ निघून जाईल
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना धरमपेठ महिला मल्टिस्टेट काे-आप. साेसायटीमध्ये नाेकरी मिळाली. त्यांनी अर्धी लढाई जिंकली हाेती. नाेकरी व घर सांभाळताना त्यांनी मुलाकडे दुर्लक्ष हाेऊ दिले नाही. त्याला उच्च शिक्षित केले. आज ताे स्वत:च्या पायावर उभा झाला आहे आणि सीमा या त्या बॅंकेत व्यवस्थापक पदावर पाेहचल्या आहेत. सीमा या सामान्य आहेत पण संघर्षाने भरलेला त्यांच्या आयुष्याचा प्रवास असामान्य आहे. संकटे येतील पण आलेली वेळ निघून जाईल हा सकारात्मक विचार तुमचे आयुष्य बदलेल, असा संदेश सीमा यांनी दिला.