महिला दिन विशेष : कठोर परिश्रमाने कर्तृत्व केले सिद्ध : एम्स संचालक विभा दत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 01:06 AM2019-03-08T01:06:11+5:302019-03-08T01:10:16+5:30
आज महिला कशातही मागे नाहीत, प्रत्येकच क्षेत्रात त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून स्वत:ला सिद्ध केले आहे, अगदी प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे. यातून सैनिकी क्षेत्रही सुटलेले नाही. या क्षेत्रात राहून डॉ. विभा दत्ता यांनी सैनिकी प्रशिक्षणात वैद्यकीय ज्ञान आत्मसात केले. प्रत्येक अडचणीला त्यांनी आवाहन म्हणून स्वीकारले. कठोर परिश्रमाने आपले कर्तृत्व सिद्ध केले. याच कर्तृत्वाचा बळावर आज त्या नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) संचालक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आज महिला कशातही मागे नाहीत, प्रत्येकच क्षेत्रात त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून स्वत:ला सिद्ध केले आहे, अगदी प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे. यातून सैनिकी क्षेत्रही सुटलेले नाही. या क्षेत्रात राहून डॉ. विभा दत्ता यांनी सैनिकी प्रशिक्षणात वैद्यकीय ज्ञान आत्मसात केले. प्रत्येक अडचणीला त्यांनी आवाहन म्हणून स्वीकारले. कठोर परिश्रमाने आपले कर्तृत्व सिद्ध केले. याच कर्तृत्वाचा बळावर आज त्या नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) संचालक आहेत.
मेजर जनरल डॉ. विभा दत्ता या दिल्ली विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स’च्या विद्यार्थिनी आहेत. ३० नोव्हेंबर १९८३ मध्ये त्या सैन्यात वैद्यकीय सेवेत रुजू झाल्या. १९८६ मध्ये पुणे येथील ‘आर्म्ड फोर्सेज मेडिकल कॉलेज’मधून पॅथालॉजीमध्ये ‘एमडी’ केले. सोबतच टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून ‘ट्यूमर हिस्टोपाथ’ व ब्रिटन येथील ‘क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल’मधून यकृत प्रत्यारोपण पॅथालॉजीचे प्रशिक्षण घेतले. एम्स दिल्लीमधून त्यांनी ऑन्कोलॉजी पॅथालॉजीमध्ये ‘पीएचडी’ केली. त्यापूर्वी त्या दिल्ली येथील कमांड हॉस्पिटलमध्ये २००९ ते २०११ पर्यंत पॅथालॉजी ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख राहिल्या. याच हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त झाल्या. डॉ. दत्ता यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘सैन्य पदक’, ‘लष्कर प्रमुख’ आणि ‘वेस्टर्न कमांड’चे प्रमुख म्हणून गौरविण्यात आले आहे.
डॉ. दत्ता म्हणाल्या, समाजात असुरक्षिततेचे प्रमाण वाढले असले तरी त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी महिलांनी सज्ज होणे गरजेचे आहे. स्वत:मधील अंगभूत क्षमता, कौशल्य व धाडस यांचा मेळ घालून नव्या उमेदीने जगण्याला सामोरे जावे. मनातील नैराश्याला सकारात्मक विचारांची जोपासना करून हद्दपार करा व जीवनातील जे उदात्त ध्येय गाठा, असे आवाहनही त्यांनी केले.
वैद्यकीय शिक्षण हे इतरांपेक्षा वेगळे आहे. या क्षेत्रात आज रोज नवीन संशोधन होत आहेत. हे संशोधन करणारे गुणवान लोकच भारताचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. म्हणूनच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला मोठे महत्त्व आहे. या संस्थेतून कौशल्यप्राप्त डॉक्टर निर्माण करणे हेच ध्येय आहे, असेही डॉ. दत्ता म्हणाल्या.